उड्डाणपुलाखालील सव्‍‌र्हिस रस्त्यासाठीच्या उपायांना हिरवा कंदील

शहरातील उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्यांवर सव्‍‌र्हिस रोडचे विस्तारीकरण, कमोदनगर, स्टेट बँक चौक व पंचवटीतील दंत विद्यालयासमोर भुयारी मार्ग करणे आणि द्वारका चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे या उपायांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मान्यता दिली आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लांबलचक उड्डाणपुलामुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यामुळे ४० तंत्रज्ञांची समिती नियुक्त करत वाहतूक समस्येचे सर्वेक्षण करण्यात आले. या समितीच्या अहवालावर अलीकडेच स्थानिकांशी चर्चा घडवून आणण्यात आली. ही चर्चा झाल्यावर दिल्ली येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक बाबी आ. फरांदे यांनी मांडल्या. या वेळी प्राधिकरणाचे अधिकारी आर. के. सिंह, अतुलकुमार, राजीव सिंह, सुधीर देऊळगावकर उपस्थित होते. इंदिरानगर ते पाथर्डी फाटा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने असलेले सव्‍‌र्हिस रस्ते अरुंद आहेत. त्यांची रुंदी कुठे कमी तर कुठे अधिक आहे. हे रस्ते समान रुंदीचे नसल्याने तसेच सव्‍‌र्हिस रस्त्यावर अनधिकृत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी, नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

मुंबई-आग्रा महामार्गास द्वारका येथे नाशिक-पुणे महामार्ग जोडलेला आहे. मुंबई-आग्रा दोन्ही बाजूने पुलावरून येणारी वाहतूक या ठिकाणी खाली उतरविण्यात आली आहे. पुलावर जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या पुलाखाली पादचारी मार्ग करण्यात आल्यामुळे चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

नागरिकांच्या वेळेचा व इंधनाचा अपव्यय होतो. सिडको स्टेट बँक चौक येथे पादचारी मार्ग नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरून ये-जा करतात. यामुळे या परिसरात नियमित अपघात होतात. सव्‍‌र्हिस रस्ता ओलांडताना तशीच स्थिती पंचवटी महाविद्यालयासमोर आहे. उड्डाणपूल उभारताना काही चुका झाल्यामुळे ही स्थिती ओढवली. इंदिरानगरचा बोगदा बंद ठेवण्यास स्थानिक कृती समितीने आधीच विरोध दर्शविला आहे.

बैठकीत बोगद्याबाबत झालेल्या चर्चेनुसार कायमस्वरूपी उपाय योजण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. इंदिरानगर ते पाथर्डी फाटा सव्‍‌र्हिस रस्ता हे सात मीटरऐवजी पदपथासह नऊ ते दहा मीटर रुंदीकरण करण्यात येईल. कमोदनगर, स्टेट बँक चौक व पंचवटीतील दंत महाविद्यालयासमोर भुयारी मार्ग करण्यास प्राधिकरणाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. द्वारका चौकातील गोलाकार भाग काढून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. उड्डाणपुलालगतच्या सव्‍‌र्हिस रस्त्यावरील दुरवस्थेवर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ सातत्याने प्रकाशझोत टाकत आहे. या पुलामुळे वाहतुकीच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली. पुलाच्या दुतर्फा मोठी नागरी वस्ती असताना त्याचा विचार पुलाच्या उभारणीत केला गेला नाही.

राजकीय सोयीने उड्डाणपुलावर जाण्यासाठी रस्ता करताना नागरिकांचा विचार केला गेला नाही. त्याचा जाच नागरिकांना सहन करावा लागत आहे. बैठकीत झालेल्या निर्णयाची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी झाल्यास दररोजच्या जाचातून सुटका होईल अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे.

Story img Loader