लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड झाल्यानंतर उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होण्याआधीच्या वर्षातील उत्पन्नाच्या तुलनेत २०२४-२५ या वर्षात उत्पन्नात चौपट वाढ झाली आहे. यावेळी संस्थानने देणगीचे सर्व उच्चांक मोडीत काढले.
गतवर्षी संस्थानच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली होती. विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या वर्षात संस्थानला १७ लाख ७२ हजार ५३८ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. त्यापुढील म्हणजे २०२३-२४ वर्षात ते ३३ लाख ३१ हजार ५७१ रुपयांवर पोहोचले. नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्पन्नाचा आकडा ६७ लाख २४ हजार १७ रुपयांवर गेला आहे. यामध्ये धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशान्वये संस्थानने केलेल्या १४ लाख २७ हजार ४९० रुपयांच्या ठेव स्वरुपातील रकमेचाही समावेश आहे.
संस्थानने विविध माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे भाविकांचा संस्थानकडे देणगी देण्याचा ओघ वाढलेला आहे. वाढीव उत्पन्नातून भाविकांना विविध सोयी सुविधा देणे संस्थानला सहजशक्य झाले आहे. त्यामुळे भाविकांनी दिलेले दान हे सत्कारणी लागत असून संस्थानवर भाविकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवलेल्या विश्वासाबद्दल संस्थान सर्व भाविकांचे ऋणी असल्याचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री यांनी म्हटले आहे.