जयपूर व आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका कविता खरवंडीकर यांच्या दोन सुश्राव्य मैफलींचा आनंद घेण्याची संधी नाशिककर रसिकांना पुण्याच्या अबीर एंटरटेनमेंट अ‍ॅण्ड इव्हेंट्स या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये २१ व २२ नोव्हेंबर या दिवशी ‘अनुभूती’ आणि ‘जाऊ देवाचिया गावा’ या मैफली होणार आहेत.
कविताताईंचे नाव शास्त्रीय संगीत क्षेत्रात अनेक वर्षांपासून परिचित आहे. डॉ. अलका देव-मारुलकर आणि पं. बबनराव हळदणकर या दिग्गजांकडून पद्धतशीर तालीम प्राप्त केलेल्या कविताताईंनी स्वत:ची अभ्यासपूर्ण गायनशैली विकसित केली आहे. मधुर आवाज, संगीताचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टिकोन आणि संगीताच्या ध्यासाने झोकून देत केलेली मेहनत या वैशिष्टय़ांमुळे त्यांचे गायन लक्षवेधी आणि श्रोत्यांच्या पसंतीची दाद घेणारे ठरले आहे. भारतात अनेक ठिकाणी कविताताईंनी गानसेवा रुजू केली असून, अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार म्हणून त्यांच्या गायनाच्या ध्वनिफितीही प्रकाशित झाल्या आहेत. २१ नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये ‘अनुभूती’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत कविताताई त्यांचे गायन सादर करतील.
दुसऱ्या दिवशी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘जाऊ देवाचिया गावा’ या मैफलीत संस्कृत स्तोत्रे आणि मराठी संतवाणी यांच्या नवीन संगीतरचना सादर होतील. या रचनांना कविताताईचे पती धनंजय खरवंडीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.
धनंजय हे पंडित विनायकराव थोरात यांचे ज्येष्ठ शिष्य असून तबलावादक आणि संगीतकार आहेत. या मैफलीत कविताताईंसमवेत नाशिकचे प्रसिद्ध गायक श्रीराम तत्त्ववादी यांचा सहभाग आहे. तत्त्ववादी यांना पंडित अण्णासाहेब थत्ते, प्रा. मिलिंद मालशे आणि डॉ. अलका देव-मारुलकर या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे. शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही प्रकारांमध्ये ते सादरीकरण करतात.
या दोन्ही मैफलींना संवादिनीची साथ उदय कुलकर्णी, तबलासाथ धनंजय खरवंडीकर करतील. ‘जाऊ देवाचिया गावा’ या मैफलीत तालवाद्यांची साथ उद्धव कुंभार, तर निरुपण रवींद्र खरे करतील. रसिकांनी या मैफलींना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader