नाशिक – शासकीय अनुदानाचे प्रस्ताव मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना सिन्नर तालुका कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या कंपनीतून शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ४०० शेती अवजारांचे शासकीय अनुदानाचे प्रस्ताव मंजूर करून पूर्वसंमती देण्यासाठी तसेच यापूर्वी मंजूर केलेल्या पूर्वसंमतीचा मोबदला म्हणून सिन्नर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे याने प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे चार लाख रुपयांची मागणी केली. तडजोडअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार मुसळगाव एमआयडीसीतील कृष्णा इंजिनिअरिंग वर्क्स येथे लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने गागरे यास ताब्यात घेतले.