नाशिक : दिवसागणिक उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य नदी, नाले व विहीरी आटल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तर स्थिती अधिक बिकट झाली आहे. आदिवासी भागातील महिलांना रात्री तसेच उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंडे तोरंगण तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या मेटकावरा, वेळुंजे, हेदलीपाडा, हेदअंबा या पाड्यांवर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टंचाई जाणवू लागली आहे. नांदगाव कोहली, खुंटपाड्यातील ग्रामस्थांना दोन किलोमीटरहून नदीतून पाणी न्यावे लागत आहे. परिसरातील खरवळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून १२ वाड्या, पाडे तिच्याशी जोडले गेले आहेत. काही वाड्या, पाड्यातील लोकांना ओहळातील झऱ्याचे दूषित पाणी भरावे लागते. देवळा, कचरपाडा, गावठा, उबुरणे या गावातील लोकांना जेमतेम पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. काहींना गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्र्यंबक तालुक्याचा पश्चिम भाग आणि गुजरात तसेच पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील ओझरखेड ग्रामपंचायतीतंर्गत कोशिंमपाडा, भुतारशेत ही टंचाईग्रस्त पाडे असून या ठिकाणी पाण्याचे टँकर येत असले तरी पाण्याचा तुटवडा जाणवतो.

हेही वाचा… नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

खडकओहळ येथील लोकांना दीड किलोमीटरवरुन पाणी आणावे लागते. कडेगहाण येथील ग्रामस्थ इतर ठिकाणाहून पाणी आणतात. बाफनविहीर येथील विहिरींनी तळ गाठला असून पाणी उपलब्ध नाही. येथील लोकांनी वारंवार तक्रार करूनही अजून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. देवडोंगरीत जेमतेम आठ दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा असून याठिकाणी गंभीर समस्या निर्माण होईल, अशी भीती ग्रामपंचायत सदस्य शंकर निबारे यांनी व्यक्त केली.

अंबोलीतील पाण्याचे नियोजन गरजेचे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली धरणातून त्र्यंबकेश्वर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये या धरणातून तालुक्यातील तहानसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यंदा धरणात कमी पाणी साठा असून, शेतकऱ्यांचे ३० पेक्षा जास्त विद्युत पंप चालू असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा… भुजबळ मुंबईत तर, गोडसे दिल्लीत… इच्छुकांची पडद्याआडून मोर्चेबांधणी

जलजीवन योजना नावालाच

दीड वर्षापासून त्र्यंबक तालुक्यात जल जीवन मिशन या योजनेचे काम चालू आहे. प्रारंभीच्या वेगानंतर योजनेच्या कामाची गती मंदावली आहे. काही ठेकेदारांचा फक्त योजना राबवा, गावाला पाणी मिळो अथवा ना मिळो, याच्याशी काही घेणेदेणे नसल्याची भूमिका आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Situation is worse in trimbakeshwar taluka of nashik district the due to water scarcity asj
Show comments