नाशिक: इगतपुरीतील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील सहा विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

इगतपुरी येथील धम्मगिरी परिसराजवळ मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहातील सहा मुलींना ३१ डिसेंबर रोजी काही खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विषयी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी इंगोळे यांनी माहिती दिली.

हेही वाचा… शबरी घरकुलांसाठी कळवणमध्ये आंदोलन

विषबाधा झालेल्या विद्यार्थिनी वसतिगृहातील एकाच खोलीतील आहेत. अन्य मुलींना हा त्रास झालेला नाही. राधा कामडी (१३), मनिषा गांडाळ (१५), प्रियंका गिलोंदे (२१), मनिषा केकी (१८), नीता करवंदे (१८) आणि नेहा खोरघडे (१४) यांनी बाहेरून श्रीखंड, पुरी वा अन्य काही दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांना त्रास झाला. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

Story img Loader