लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला असून त्या विवाहित आहेत. विदेश मंत्रालयाच्या परदेशी नागरिकांची नोंद करणाऱ्या कार्यालयाकडून अद्याप पाकिस्तानी नागरिकांविषयी कोणतीही लेखी सूचना स्थानिक प्रशासनाला आलेली नाही.
केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले असून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही देखील सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलीस प्रशासन माहिती संकलित करत आहे. पर्यटक व्हिसा वापरुन पाकिस्तानातून सहा महिला नाशिकमध्ये आल्या असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. या महिला विवाहिता आहेत. अद्याप विदेश मंत्रालयाच्या परदेशी नागरिक नोंदणी विभागाकडून कोणत्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना मिळाल्यानंतर या महिलांविषयी पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी, कोणत्याच सूचना मिळालेल्या नसल्याने परदेशातील नागरिक किती आणि कोण, याची आकडेवारी अद्याप मिळवली नसल्याचे सांगितले.
शासनाच्या निकषानुसार आलेली नाशिक ग्रामीणमध्ये एकही पाकिस्तानी व्यक्ती नाही. नाशिक शहर पोलिसांकडून याविषयी अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. -जलज शर्मा (जिल्हाधिकारी, नाशिक)