जळगाव – रविवारी जामनेरनजीक बस आणि मालमोटारीचा अपघात झाला. त्यात पाच ते सहा बस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली. महामंडळाच्या बसना रोजच अपघात घडत आहेत. जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन आदळल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्या अपघातात नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
हेही वाचा >>> नाशिक: पीओपीची मूर्ती विक्री न करण्याचे हमीपत्र घेण्याचे नियोजन; पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी महापालिकेची तयारी
रविवारी सकाळी दहा-अकराच्या सुमारास जामनेर शहरानजीक रावेर येथील आगाराच्या रावेर- तुळजापूर बसला अपघात झाला. बस आणि मालमोटारीची धडक झाली. चालक हा मालमोटार वळवीत असताना बसला धडकली. अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रावेरहून बस भुसावळ, बीड, धाराशिवमार्गे तुळजापूरला निघाली होती. अपघातातील जखमींना तातडीने घटनास्थळासमोरील श्री समर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कोणतीही दुखापत झालेली नाही. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.