क्रीडा क्षेत्रात आनंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : २०१७-१८ वर्षांसाठी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांवर पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे. एकूण सहा पुरस्कार पटकावीत नाशिकने षटकार ठोकला आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी असणाऱ्या सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्कारांची बुधवारी मुंबई येथे घोषणा करण्यात आली. अ‍ॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरेची पुरस्कारासाठी थेट निवड करण्यात आली. याशिवाय तलवारबाजीत रोशनी मुर्तडक आणि अक्षय देशमुख, नौकानयनमध्ये पूजा जाधव आणि राजेंद्र सोनार, क्रीडा संघटक म्हणून संजय होळकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव (केतकी) येथील धावपटू मोनिका आथरेला याआधीच शिवछत्रपती पुरस्कार मिळणे आवश्यक होते. भारताचे विश्व मॅरेथॉनमध्ये प्रतिनिधित्??व केलेल्या मोनिकाने अलीकडेच सप्टेंबर २०१८ मध्ये ओडिशात झालेल्या ५८ व्या खुल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत पाच हजार आणि १० हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली होती. ती भोसलाच्या मैदानावर आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सध्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे सराव करू शकत नसलेल्या मोनिकासाठी हा पुरस्कार आनंदाचा ठेवा घेऊन आला आहे.

तलवारबाजीत प्रत्येक वेळी नाशिकच्या वाटय़ाला एक तरी शिवछत्रपती पुरस्कार असतोच. या वेळी रोशनी मुर्तडक आणि अक्षय देशमुख यांनी पुरस्कार मिळविले. तलवारबाजीमध्ये नाशिकला आतापर्यंत मिळालेल्या शिवछत्रपती पुरस्कारांची संख्या त्यामुळे १६ पर्यंत पोहचली असल्याची माहिती तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी आणि स्वत: दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार मिळविलेले अशोक दुधारे यांनी दिली. विशेष म्हणजे दुधारे यांचा मुलगा अजिंक्य आणि मुलगी अस्मिता यांनीही याआधी शिवछत्रपती पुरस्कार मिळविलेला आहे.

पूजा २००८ पासून नौकानयनचे प्रशिक्षण घेत असून पाच वर्षांपासून राज्यस्तरावरील स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवीत आहे. २०१६ वर्षांच्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत पूजाने तीन पदकांची कमाई केली होती. राजेंद्र सोनारने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तीन पदक प्राप्त केले असून याशिवाय अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य मिळविले आहे. राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पाच वर्षांपासून सुवर्णपदकाची कमाई करीत आहे. प्रशिक्षक अंबादास तांबे यांसह इतरांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

क्रीडा संघटक म्हणून नाशिक येथील मराठा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय होळकर यांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. १९९० पासून क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत असलेले होळकर हे योगा, टेनिक्वाइट, रोलबॉल, टार्गेटबॉल या खेळांच्या संघटनांवर कार्यरत आहेत.

 

नौकानयनमध्ये जोरदार वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत माजी महापौर प्रकाश मते आणि त्यांचे पुत्र विक्रांत मते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या वॉटर्स एज क्लबचा मोठा वाटा आहे. पूजा जाधव आणि राजेंद्र सोनार यांनी त्यात भर घातल्याने नौकानयनमध्ये नाशिकच्या शिवछत्रपती पुरस्कारांची आतापर्यंतची संख्या पाचवर गेली आहे.