नाशिक – शहाद्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनाची येवला-मनमाड रस्त्यावरील कासारखेडे शिवारात येवल्याहून मनमाडकडे जाणाऱ्या वाहनाशी धडक होऊन सहा जण जखमी झाले. बुधवारी दुपारी हा अपघात झाला.
शहादा येथील बोरसे कुटुंबीय शिर्डी येथे दर्शनासाठी येत होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे वाहन मनमाड रस्त्यावरील कासारखेडे शिवारात आले असता येवल्याहून येणाऱ्या वाहनाला धडक बसली. अपघातात मनोहर माळी (३०), रोहिदास बोरसे (३२), हरी माळी (२८), जयश्री माळी (२८), प्रमिला माळी (५०), रुपाली बोरसे (३०), भार्गवी बोरसे (आठ), शिव बोरसे, कृष्णा माळी हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच येवल्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना येवल्याच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने येवल्यातील किरणसिंग परदेशी यांनी समाजमाध्यमातून आवाहन केल्यानंतर वैद्यकीय मदत वेळेत पोहोचली. सोशल मीडिया फोरमच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवक सचिन शिंदे यांच्या मित्र मंडळींनी जखमींना मदत केली.
हेही वाचा – शक्ती कायद्याला केंद्र सरकारचा खोडा, दीपिका चव्हाण यांची तक्रार
सध्या मनमाड पुलाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक जण पर्यायी मार्गाचा अवलंब करत असल्याने शहर परिसरातील काही रस्त्यांसह अन्य मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वेळ वाचवण्याच्या नादात अपघात होत आहेत.