लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल सायबूपाडा- निमड्या रस्त्यावरील अली नाल्याजवळ ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर रावेर पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रावेरपासून ३५ किलोमीटरवरील निमड्यानजीक अली नाल्याजवळ शनिवारी संजय पावरा हा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक कैलास नगरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्यासह रावेर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृताची दुचाकी, फुटलेला भ्रमणध्वनी, दारूच्या रिकामा दोन बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत भ्रमणध्वनीतील संपर्काचे विवरण पाहून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.