धुळे: शहरातील नवनाथ नगरातील शुभम साळुंखे या तरुणाच्या खून प्रकरणातील लाल डोळा, जिभ्या यांच्यासह सहा संशयितांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. नाशिक, पुणे, मध्यप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी संशयित पळाले होेते.
पूर्ववैमनस्यातून शुभम साळुंखे (२७, रा.नवनाथ नगर, धुळे) या तरुणाचा आठ सप्टेंबरच्या मध्यरात्री आठ जणांनी खून केला होता. या प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील संशयित मध्य प्रदेश, राजस्थान, पुणे, नाशिक या ठिकाणी पसार झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पेालीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार अधीक्षक संजय बारकुंड, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पाटील यांनी उपनिरीक्षक साहेबराव सूर्यवंशी, सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार संदीप सरग, योगेश चव्हाण, तुषार सूर्यवंशी, शशी देवरे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, हेमंत बोरसे यांचा समावेश असलेली पथके शोधासाठी पाठवली होती.
हेही वाचा… शिंदखेडा तालुक्यातील खासगी बस अपघातात २० प्रवासी जखमी
पथकाने महेश पवार उर्फ लाल डोळा, जगदीप चौधरी (दोघे रा.स्वामी नारायण कॉलनी, धुळे), गणेश माळी (रा.शांतीनगर, धुळे) या तिघांना पुण्यातून अटक केली. अक्षय साळवे आणि जयेश खरात उर्फ जिभ्या हे राजस्थानात पसार झाले होते. ते इंदूरकडे येत असताना एका खासगी आराम बसमधून दोघांना अटक झाली. गणेश पाटील याला पारोळा रोडवरुन अटक झाली. यातील महेश पवार उर्फ लाल डोळाविरुध्द १५, अक्षयविरुध्द नऊ, गणेशविरुध्द दोन, जगदीशविरुध्द चार तर जयेशविरुध्द १२ गंभीर गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे.