नाशिक – हातमजुरी करणाऱ्या कामगाराच्या सहा वर्षीय मुलीने एक रुपयाचे नाणे गिळले असतानाही उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम देणे अशक्य असल्याने कुटूंबाने नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अलगट कुटूंबातील सहा वर्षीय दिया ही आई पाणी भरत असताना खेळत होती. खेळताना एक रुपयाचे नाणे तिच्याकडून गिळले गेले. काही वेळाने तिला उलट्या होऊ लागल्या. आईने विचारल्यावर तिने नाणे गिळल्याचे सांगितले. वडील कामावर असल्याने शेजाऱ्यांनी मदत करुन तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.
हेही वाचा >>> जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
एक्स-रे मध्ये तिच्या पोटात नाणे असल्याचे दिसले. डॉक्टरांनी नाणे काढण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. हातावर पोट असणाऱ्या कुटूंबाला ही रक्कम अशक्यप्राय वाटली. त्यामुळे त्यांनी मुलीला घरी नेले. नातेवाईकांकडून काही पैसे मिळवत मुलीला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले. खर्च परवडणारा नसल्याने पालकांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. वेळीअवेळी पाणी येत असल्याने नेहमीच गोंधळ उडतो. गुरुवारी अचानक कमी दाबाने पाणी आले. पाणी भरण्यात लक्ष असल्याने मुलीकडे दुर्लक्ष झाले. तेवढ्यात तिने नाणे गिळले. डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी खूप खर्च येईल सांगितले. नाईलाजाने तिला घरी आणावे लागले.
उसनवारी करुन काही पैसे जमा करुन पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. – मनिषा अलगट (दियाची आई)