जळगाव: देशहितासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली असून, ते देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. आता ती महाराष्ट्रात दाखल झाली आहे. पदयात्रेंतर्गत अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीनला शेगाव येथे सभा होणार असून, सभेला जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व समविचारी पक्षांचे सुमारे सोळा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी माहिती दिली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, अशोक लाडवंजारी, गांधी विचार मंचचे प्रा. शेखर सोनाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले की, देशात जात, धर्म व प्रांत या नावाखाली वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. देशहितासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली आहे. पदयात्रेला १७८ समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पदयात्रेंतर्गत अठरा नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये होणार्या सभेला जिल्ह्यातून सोळा हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती राहील, असा दावा करीत यासाठी दोनशे बस व खासगी वाहनांद्वारे सर्वजण रवाना होणार आहेत, असे सांगत आपापले तिकीट काढून एसटीतून प्रवास करण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा : नांदुर शिंगोटे दरोडा प्रकरणात सात संशयितांना अटक; टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई होणार
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष व समविचारी पक्षांचा यात्रेला पाठिंबा मिळत असल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते शेगावच्या सभेला जाणार आहेत, असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष देवकर यांनी विरोधकांवरील सत्ताधार्यांच्या टीकेला उत्तर देण्याचे काम खासदार गांधी करीत असल्याचे सांगितले. प्रा. सोनाळकर यांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा असल्याचे सांगितले.