नाशिक – गतवर्षी राबविलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेची यशस्वीता पाहता एक फेब्रुवारीपासून पुन्हा या मोहिमेचा शुभारंभ करून लोकसहभागातून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेच्या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट यांच्यासह सर्व तालुका जलसंधारण अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला हे उपस्थित होते.

हेही वाचा – नाशिक : अभाविपचे आरोग्य विद्यापीठात आंदोलन, शिक्षण मंत्र्यांसह कुलगुरुंकडून दखल

जिल्हाधिकारी शर्मा यांनी, रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन देण्यात येणार असल्याने धरणांची पातळी आजच्या तुलनेत कमी होईल, असे सांगितले. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून अभियानाची सुरवात केल्यास पावसाळ्यापूर्वी निश्चितच धरणक्षेत्रातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहे. सद्यस्थितीत ज्या तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा आहे, अशा तालुक्यांमधून अभियानाची सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली. या मोहिमेत नगरपालिका, नगर परिषद, सेवाभावी संस्थांना सहभागी करावे, धरणक्षेत्रातील काढलेला गाळ शेतकरी, रोपवाटिकाधारक , महानगरपालिका, नगरपरिषद यांची उद्याने यांना मोफत उपलब्ध करून द्यावा, या मोहिमेची नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत केल्या.

हेही वाचा – मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यात अनोखा विक्रम

ग्रामपंचायतींचा ठराव घ्यावा

तालुकास्तरावर किमान एका गावातील तलावामधील गाळ काढण्याचे नियोजन लोकसहभाग व संस्थांच्या मदतीने प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी केल्यास मोहिमेला गती मिळेल, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी सांगितले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा ठराव घेवून जिल्हास्तरीय समितीस सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यास प्रशासकीय मान्यता घेता येईल. तसेच काढलेला गाळ स्वखर्चाने नेणाऱ्या शेतकऱ्यांची अवनी ॲपवर नोंदणी करावी, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी झुरावत यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sludge dam silt campaign nashik district febraury ssb