स्मार्ट रस्ताबांधणीतील त्रुटी दूर होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : बहुचर्चित स्मार्ट रस्त्यामुळे वाहनधारकांना सीबीएस सिग्नलवर डाव्या बाजूला मुक्त वळण घेण्याची सुविधा हिरावली गेली आहे. संबंधित वाहनधारकांना नाहक सिग्नलवर अडकून राहावे लागते. माहितीअभावी कोणी डाव्या बाजूला वळण घेण्याचा प्रयत्न केला तर सिग्नल मोडल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागते. वाहतूक पोलीस विभागाने सीबीएस चौकात निर्माण झालेल्या या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने वाहनधारकांना डाव्या बाजूला मुक्त वळण देण्यासाठी सीबीएस चौकात आवश्यक ते बदल करण्याची तयारी दर्शविली आहे.

लवकरच स्मार्ट रस्त्यावर वाहनधारकांना डाव्या बाजूला मुक्त वळण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान कोटय़वधी रुपये खर्चून उभारलेला स्मार्ट रस्ता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. बऱ्याच भवतीन्भवतीनंतर स्मार्ट रस्ता पूर्ण झाला, पण त्याच्याशी निगडित वेगवेगळ्या समस्या कायम राहिल्या. रस्त्यावरून मार्गस्थ होताना वाहनधारकांना तो समतल नसल्याची जाणीव होते.

स्मार्ट रस्त्यामुळे सीबीएस सिग्नलवर वेगळीच समस्या निर्माण झाली.

खरे तर सिग्नलवर डाव्या बाजूला वळण घेणाऱ्यांना थांबावे लागत नाही. मुक्तपणे वळण घेण्याची त्यांना मुभा असते. स्मार्ट रस्त्यामुळे सीबीएस चौकात ती सुविधा हिरावली गेली. त्र्यंबक रस्त्यावर डाव्या बाजूला मुक्त वळण घेता येईल ही व्यवस्था आहे. तशी सीबीएस चौकात मात्र नाही. शरणपूर रस्त्यावरून येणारे वाहनधारक मेहेर चौकाकडे जाण्यासाठी मुक्त वळण घेऊशकत नाहीत.

सिग्नलवर थांबूनच त्यांना डाव्या बाजूला वळण घ्यावे लागते. शालिमारकडून येणाऱ्या वाहनधारकांना त्र्यंबक नाका चौकाकडे म्हणजे डाव्या बाजूला वळण घेता येत नाही. तिथे वळण घेण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र त्या वळणावर रिक्षावाल्यांनी कब्जा केलेला आहे. या परिस्थितीत कोणी वाहनधारकाने सिग्नलकडे लक्ष न देता डाव्या बाजूला मुक्त वळण घेतलेच तर वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.

डाव्या बाजूला जाऊ इच्छिणारे वाहनधारक नाहक सिग्नलवर अडकून पडतात. या वाहनांचे रखडणे वाहतूक कोंडीला कारक ठरते. वाहनधारकांची अडचण आणि सिग्नलवर डाव्या बाजूला वळण घेऊ इच्छिणाऱ्या वाहनांच्या रखडण्याचा मुद्दा वाहतूक पोलिसांनी स्मार्ट सिटी कंपनीसमोर मांडला आहे. सीबीएस चौकातील या समस्येवर स्मार्ट सिटी कंपनीने तोडगा काढण्याची तयारी सुरू केली आहे. डाव्या बाजूला मुक्त वळण घेण्यासाठी काय करता येईल, या दृष्टीने  सल्लागारामार्फत रचना तयार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्मार्ट रस्त्यावर लवकरच हे काम केले जाणार आहे.

शरणपूर रस्त्यावरून मेहेर चौकाकडे स्मार्ट रस्त्यावरून जाताना म्हणजेच सीबीएस चौकात सिग्नलवर न थांबता मुक्त वळण घेता यावे यासाठी सल्लागारामार्फत रचना तयार करण्यात आली आहे. ‘आयआरएस’च्या निकषानुसार स्मार्ट रस्त्याची उभारणी झाली. त्याअंतर्गत डाव्या बाजूला मुक्त वळणाचा निकष नाही. काही बाबींमुळे स्थानिक पातळीवर प्रश्न उद्भवतात. या संदर्भात वाहतूक पोलीस विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने सीबीएस चौकात वाहनधारकांना डाव्या बाजूला मुक्त वळण घेता यावे म्हणून लवकरच आवश्यक ते काम केले जाणार आहे.

– प्रकाश थविल (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी)