स्मार्ट सिटी योजनेच्या कामात रामकुंड परिसरात पुरातन पायऱ्या, सांडव्याची तोडफोड केली गेली. पावसाळ्यापूर्वी तुटलेल्या पायऱ्यांचे बेसाल्ट दगड जपून ठेवणे आवश्यक होते. मात्र तशी काळजी न घेतल्याने ते पुरात वाहून गेले. त्यामुळे गोदापात्र कोरडे करून त्या दगडांचा शोध घेऊन त्यांचा पुरातन पायऱ्या पूर्ववत करताना वापर करण्याचा नाशिककर आणि हिंदुत्ववादी संघटनांचा आग्रह अखेर स्मार्ट सिटी कंपनीने मान्य केला आहे. गोदावरीचे पात्र कोरडे करून आता वाहून गेलेल्या दगडांचा शोध घेतला जाणार आहे. याच सुमारास काही कुंडातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नाशिक : पक्षांतर करणाऱ्यांच्या जागी मनसेत पर्याय – अमित ठाकरे यांचा दावा
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सुशोभिकरणाच्या नावाखाली रामकुंड परिसरात केलेल्या तोडफोडीविरोधात नाशिककर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मध्यंतरी सत्याग्रह आंदोलन केले होते. स्मार्ट सिटी कंपनी आणि आंदोलक यांच्यात बैठक पार पडल्यानंतर बुधवारी रामकुंड परिसरात संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीळकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू आहे. या ठिकाणी परवानगी न घेता कंपनीने काम केले. दोन वर्षांपूर्वी गोदापात्रातील देवी मंदिराजवळील सांडवा तोडण्यात आला, यशवंतराव चव्हाण पटांगण परिसर प्रतिबंधित क्षेत्र असतांना या ठिकाणी फरशा बसविण्याचे काम हाती घेतले गेले. नदीच्या मूळ रुपाला धक्का लागता कामा नये, अशी स्थानिकांसह आंदोलकांची भूमिका आहे. गोदावरी नदी पात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधणे, यशवंतराव महाराज पटांगण येथे तोडलेल्या पायऱ्या पुरातन पध्दतीने बसवून द्याव्यात, असा आंदोलकांचा आग्रह आहे. या पायऱ्यांसाठी बेसाल्ट दगड वापरला गेला होता. पुन्हा हा दगड मिळणे अवघड आहे. नेवासा येथे त्याची टंचाई आहे. पुरातून पायऱ्या काढताना त्या दगडाची जपवणूक झाली नाही. पावसात तो वाहून गेला. नदीपात्र कोरडे करून तो दगड पात्रात मिळू शकेल. त्या अनुषंगाने स्मार्ट सिटी कंपनीने शोध मोहीम राबवावी, अशी मागणी जानी यांनी केली. तो दगड सापडल्यास पायऱ्यांच्या कामात त्याचा पुनर्वापर करता येईल. तसे झाल्यास या कामास हिरवा कंदील दाखविण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
हेही वाचा >>> नाशिक : वाहतूक समस्यांनी अपघात,कोंडी अन् उद्योग-व्यवसायालाही झळ; वाहतूकदार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे
गोदावरी काँक्रिटीकरणमुक्त करण्याच्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात पाच कुंडातील काँक्रिट काढण्याचे निश्चित झाले होते. यातील दोन कुंडाचे काम ७०-८० टक्के झाले असले तरी अन्य तीन कुंडांचे निम्मेही काम झालेले नाही. गोदापात्र कोरडे झाल्यास उर्वरित कामही पूर्ण करता येईल, याकडे लक्ष वेधले गेले. पात्र कोरडे झाल्यानंतर कुंडातील किती काम झाले, किती झाले नाही, याची स्पष्टता होणार आहे.
नीळकंठेश्वर मंदिराच्या पायऱ्या पूर्ववत करण्यासाठी वापरला जाणारा दगड संबंधितांना दाखविण्यात आला. या कामात जुन्या दगडाचा वापर करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार आता गोदावरी पात्रात जुन्या पायऱ्यांच्या दगडाचा शोध घेतला जाणार आहे. याकरिता गोदावरीचे पात्र कोरडे करण्यासाठी मनपा आयुक्तांना विनंती केली जाणार आहे. याच काळात रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण काढण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
– सुमंत मोरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी)