महात्मा फुले कला दालनात अनुभूती केंद्राची उभारणी

स्मार्ट रस्ता आणि इतरही प्रकल्पांमुळे सातत्याने टीकेचे धनी व्हावे लागणाऱ्या नाशिक महापालिका स्मार्ट सिटी कंपनीने आता आपल्या प्रकल्पांचे अनोखे स्वरूप, वेगळेपण नागरिकांसमोर मांडण्याची तयारी केली आहे. सुरक्षित शहर उपक्रमांतर्गत महात्मा फुले कला दालनात नागरिक अनुभूती केंद्र उभारण्याचा मानस आहे. या केंद्रात एकाच छताखाली नाशिकच्या ऐतिहासिक, आध्यात्मिक, औद्योगिक आणि भविष्यातील स्मार्ट शहराची अनुभूती टुडी, थ्रीडी स्वरूपात दिली जाणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनी सिटिझन एक्सपिरियन्स सेंटर उभारण्याचा विचार करत आहे. महात्मा फुले कला दालनच्या पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कंपनीच्या पथकाने पाहणी केली. या केंद्रात नागरिकांसह पर्यटकांना आभासी वास्तव स्वरूपात अनुभूती मिळणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती तसेच त्या प्रकल्पांच्या प्रतिकृती, विविध प्रकारच्या ध्वनिचित्रफिती, इनोव्हेशन हब, नवउद्यमींची माहिती असणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्ण झालेले, सुरू असलेले आणि सुरू होणाऱ्या प्रकल्पांची माहिती येथे दिली जाईल. केंद्र मध्यवर्ती भागात असल्याने आणि मोफत प्रवेश असल्याने येथे भेट देणाऱ्यांची अन् अनुभव घेणाऱ्यांची संख्या वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट काही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मध्यवर्ती भागातील स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे शहरवासीय वेठीस धरले गेले. मुदत संपूनही हे काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.

महाकवी कालिदास कलामंदिर आणि जिथे अनुभूती केंद्र उभारले जाणार आहे त्या कला दालनाचे नूतनीकरण तसेच अन्य प्रकल्पांवरून नगरसेवकांकडून वारंवार टीका केली जाते. त्यास उत्तर देण्याचा प्रयत्न केंद्राकडून अप्रत्यक्षपणे केला जाईल.

आभासी वास्तव अनुभूती

कला दालनात स्मार्ट प्रकल्पांची माहिती भिंतींवर छायाचित्र आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून दिली जाईल. तसेच स्मार्ट सिटीअंतर्गतच्या प्रकल्पांची माहिती त्या प्रकल्पांच्या टुडी आणि थ्रीडी प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच शिल्पाद्वारे प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. ऐतिहासिक तथा मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा नाशिक शहराचा प्रवास येथे लघुपटाच्या माध्यमातून उभा करण्यात येणार आहे. एक ‘डार्क रूम’ म्हणजेच आभासी वास्तव अनुभव कक्ष  असणार आहे. त्यामध्ये ३६० अंशात बनविण्यात आलेल्या माहितीपटांचा अनुभव घेता येईल.

Story img Loader