नांदेड-कुर्ला हॉलिडे एक्स्प्रेस या धावत्या गाडीच्या दोन बोग्यांखालून अचानक मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. गुरूवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील उगाव रेल्वे स्थानकात ही गाडी साखळी ओढून थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी व जागृत प्रवाशांनी अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित केली. तब्बल ३५ मिनिटानंतर ही गाडी नाशिककडे मार्गस्थ झाली. दरम्यान गाडीतून धूर निघू लागल्यावर दोन ते तीन प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या घेतल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा- सुंदर नारायण मंदिर जिर्णौध्दाराचा पहिला टप्पा पूर्ण
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास नांदेड-कुर्ला हॉलिडे स्पेशल ही गाडी नाशिकसाठी मार्गस्थ झाली. लासलगाव रेल्वे स्थानकातून ही गाडी निघाल्यानंतर या गाडीच्या इंजिनपासून पाचव्या आणि सहाव्या बोगीखालून (एस तीन आणि एस चार) मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला. सुरुवातीला डिझेल इंजिनचा धूर असावा असे वाटल्याने प्रवाशांनी दुर्लक्ष केले. पण नंतर धुळीचे लोळ उठू लागले. त्यानंतर बोगीखालून घालून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रवाशांनी तात्काळ गाडीची साखळी ओढली. एव्हाना गाडी उगाव रेल्वे स्थानकाजवळ पोचली होती. चालकाला इशारा मिळाल्यानंतर त्याने उगाव रेल्वे स्थानकात गाडी थांबवली. घाबरलेल्या प्रवाशांनी या दोन्ही बोगीतून पटापट खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- नाशिक : सौर ऊर्जा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या
जवळपास पाच ते सहा बोग्यांमधील प्रवाशांत घबराट पसरली. रेल्वे प्रवासी आणि जागृत नागरिकांनी तात्काळ या दोन्ही बोगींचा ताबा घेतला आणि खालील बाजूने अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित केली. अग्निरोधक पावडर सोडण्यात आली. त्यानंतर हा धूर आटोक्यात आला. बोगीच्या खाली असलेल्या लायनिंग वायर सर्किटच्या घर्षणामुळे हा धूर निघाल्याचे सांगण्यात येते. ३५ मिनिटानंतर हा धूर निघणे थांबले.आणि गाडी नाशिककडे रवाना झाली.