जळगाव : यावल तालुक्यातील नायगाव- किनगाव रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री गस्त घालत असताना अवैध लाकूड तस्करी करणार्या मालवाहू वाहनावर कारवाई करीत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मालवाहू वाहन यावल येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले. मात्र, वाहनचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
यावल तालुक्यात लाकडाची तस्करी केली जात असून, तस्करांवर यावल पश्चिम वनविभागातर्फे कारवाईची मोहीम राबविली जात आहे. नायगाव- किनगाव रस्त्यावर लाकडाने भरलेले मालवाहू वाहन जात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना मिळाली. धुळे येथील वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी आर. आर. सदगीर यांच्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे व यावलच्या गस्ती पथकाचे वनक्षेपाल अजय बावणे यांच्या नेतृत्वात वनपाल आर. बी. थोरात, वाघझिरा येथील वनपाल विपुल पाटील, निंबादेवीचे वनरक्षक अक्षय रोकडे, मनुदेवीचे वनरक्षक चेतन शेलार, योगिराज तेली, पोलीस कर्मचारी सचिन तडवी यांनी सापळा रचत संशयास्पद वाटणारे भरधाव मालवाहू वाहनास अडविले. त्यात सुमारे पाच घनमीटर खैर लाकूड मिळून आले. वाहनासह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करीत यावल येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले.
हेही वाचा… मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण : नाशिकपासून सुरुवात करण्याचा निर्णय
हेही वाचा… आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
वन व वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड यासंबंधी कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन यावलच्या गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी केले आहे.