आरक्षणाच्या घोळामुळे ठरावीक डब्यांमध्येच गर्दी

अनिकेत साठे, लोकसता

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पावणेसहा महिने विश्रांती घेणारी मनमाड- नाशिक- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा रुळावर आली असली तरी आरक्षणाच्या घोळामुळे प्रवासात सुरक्षित अंतराच्या नियमास तिलांजली मिळत आहे. रेल्वे गाडीची दीड हजार आसन क्षमता आहे. दैनंदिन ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून प्रारंभीच्या पाच ते सहा डब्यांतील सलग आसनांचे आरक्षण दिले जात असल्याने तिथे प्रवाशांची एकच गर्दी होते. उर्वरित नऊ ते १० डबे रिकामे असतात. माहितीअभावी आरक्षित आसन सोडून प्रवासी तिकडे जात नाहीत. तशी उद्घोषणादेखील रेल्वे प्रशासन करत नसल्याने प्रवाशांना गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करणे भाग पडले आहे.

पंचवटी एक्स्प्रेस १२ सप्टेंबर रोजी सुरू झाल्यामुळे मनमाड, नाशिकमधील प्रवाशांना दिलासा मिळाला. पावणेदोनशे दिवसांनंतर विशेष रेल्वे गाडी म्हणून सुरू झालेल्या पंचवटीचे मनमाड, नाशिक रोड स्थानकात जल्लोषात स्वागत झाले होते.  सध्या गाडीने केवळ आरक्षण करणाऱ्यांना प्रवास करता येतो. पासधारक, सामान्य प्रवाशांना परवानगी नाही. नोकरी, व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांना मासिक पास दिला जात नाही. त्यांना आरक्षण करून प्रवास करणे क्रमप्राप्त ठरले. रेल्वे प्रवासात  नियमांचे पालन होण्याची आवश्यकता आहे; परंतु पंचवटीत हे नियम पाळणे अवघड झाले आहे. त्यास रेल्वेकडून दिले जाणारे आरक्षण कारणीभूत ठरल्याचे प्रवासी सांगतात.

एरवी प्रवाशांनी तुडुंब भरणाऱ्या पंचवटीला सध्या फारसा प्रतिसाद मिळत नाही. क्षमतेच्या ३५ ते ४० टक्केच आरक्षण होते. दररोज ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. रेल्वे गाडीत आसनव्यवस्था असणाऱ्या एकूण १६ बोगी आहेत. प्रत्येक बोगीत तीन अधिक तीन म्हणजे एका रांगेत सहा आसने आहेत. त्यातील इंजिनापासून मागे असणाऱ्या पाच ते सहा बोगीत आरक्षण मिळते. प्रवासात सर्व प्रवाशांना एकमेकांना खेटून बसावे लागते.

दुसरीकडे उर्वरित नऊ ते १० डबे पूर्णपणे मोकळे असतात. माहितीअभावी अन्य प्रवासी तिकडे बसण्यासाठी जात नाहीत. रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर मागील डबे रिक्त असल्याची माहिती दिली, सुरक्षित अंतराच्या निकषाचे पालन होण्यासाठी प्रवाशांना तिकडे जाण्याचे आवाहन केल्यास नाशिक-मुंबई प्रवासात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, याकडे लक्ष वेधले जात आहे. तीन आसनांमधील एक आसन वगळून आरक्षण दिले तरी सुरक्षित अंतराचा नियम पाळता येईल.

सध्या गाडीत क्षमतेपेक्षा बरेच कमी प्रवासी असतात. त्यामुळे आरक्षण देतानाच तशी व्यवस्था केल्यास प्रवाशांचे आरोग्य जपले जाईल, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

आरक्षण देण्याची प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून पार पडते. संगणकीय आज्ञावलीत आवश्यक ते बदलही संबंधित ठिकाणी केले जातात. आरक्षण देतानाच दोन प्रवाशांमध्ये एक आसन रिक्त ठेवण्याच्या उपायाबाबत स्थानिक पातळीवर काही करता येत नाही. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक स्थानकाचे बोगीनिहाय आरक्षण असते. सध्या या गाडीत फारसे प्रवासी नाहीत. त्यामुळे गर्दी होत नाही. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळावे, अशी उद्घोषणा करूनही उपयोग नसतो. कारण प्रवासी तिकिटावरील क्रमांकानुसार आसनस्थ होतात. रेल्वे स्थानकावर निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी महापालिकेचे पथक तैनात असते.

 – आर. के. कुठार (मुख्य अधिकारी,   नाशिक रोड रेल्वे स्थानक)

Story img Loader