तीन आठवडय़ांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे संकेतस्थळ प्रतिसाद देत नसल्याने शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. अर्ज भरण्यासाठी विहित करण्यात आलेली मुदत संपण्यास केवळ काही दिवस शिल्लक असताना अर्ज भरला गेला नाही तर शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागेल की काय आणि पर्यायाने संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरावे लागण्याची धास्ती अनेक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, या तांत्रिक अडचणींबाबत संबंधितांकडून काहीच स्पष्टीकरण दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांची घालमेल अधिकच वाढत आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना दरवर्षी ऑनलाइन अर्ज भरणे क्रमप्राप्त असते. अनुदानित तत्त्वावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कमी प्रमाणात आर्थिक मदत होत असते. परंतु विनाअनुदानित तत्वावरील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होत असतो. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा भार या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासन उचलत असल्यामुळे अशा प्रकारे प्राप्त होणारी शिष्यवृत्ती मागास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा आधार ठरत असते. यंदा शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ही ३० नोव्हेंबपर्यंत घालून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध शाळा-महाविद्यालयांचे संबंधित विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेवर वाऱ्या घालत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरतात.
सामाजिक न्याय विभागाने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनीवर प्रारंभी पासवर्ड प्राप्त करून देण्याची कार्यपद्धती आहे. त्या पासवर्डच्या आधारे पुढील प्रक्रिया सुरू होऊन अन्य आवश्यक माहिती भरली जाते. परंतु विद्यार्थ्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनीवर पासवर्डच प्राप्त होत नाहीत. बहुप्रतीक्षा करूनही पासवर्ड प्राप्त होत नसल्याने आणि गेल्या तीन आठवडय़ांपासून हाच अनुभव येत असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना हे अर्ज भरणे शक्य झाले नसून आता चार-पाच दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. सध्या बऱ्याच शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा आहेत. मात्र मुदत कमी राहिल्याने शिष्यवृत्तीचा अर्ज भरला जावा म्हणून विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी याच कामासाठी शहराच्या ठिकाणी वारंवार खेटा घालत आहेत. पण, चकरा मारूनही अर्ज भरता येत नाही. संबंधित शाळा-महाविद्यालये या तांत्रिक अडचणीच्या संदर्भात अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते तर सामाजिक न्याय विभागाकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यावर एक तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा दूरध्वनी आपटत खाली ठेवला जातो, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.