महिलांनी अनुसरली स्वयंरोजगाराची वाट

गावकुसाबाहेरील ती वस्ती वाळीत टाकल्याने तेथील प्रश्न सर्वसामान्यांसाठी जणू काही गौण ठरले आहेत. सध्या त्या वस्तीत राहणाऱ्या महिला वस्तीची ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने वस्तीतील महिला देहविक्रीचा व्यवसाय सोडून या परिस्थितीतून बाहेर पडावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना येथील तुलसी बहुउद्देशीय संस्थेची साथ लाभली आहे. संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाने वस्तीतील १५ महिला आता कागदी पिशव्या तयार करण्याचे काम करीत आहेत. कामाची व्याप्ती वाढली तर हा आकडाही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

देहविक्री करणाऱ्या महिलांचा शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागात तसेच महिला धोरणात कोठेही विचार झालेला नाही. देहविक्री करताना पोलिसांनी छापा टाकला तर त्या महिलांची सोडवणूक करायची, त्यांना महिला आश्रमात दाखल करायचे, पण त्यांनी या दलदलीतून बाहेर पडावे यासाठी प्रशासनाकडून कोणतीच ठोस कार्यवाही केली जात नाही. अशा स्थितीत येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टने भद्रकाली परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना एकत्रित करून हे काम न करण्याविषयी प्रबोधन केले. त्यांच्या प्रबोधनामुळे आज ३५ ते ४५ वयोगटातील महिला हा व्यवसाय न करता अन्य कामधंदे शोधण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. या महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी संस्थाही प्रयत्न करत आहे. या अंतर्गत तुलसी बहुउद्देशीय संस्थेच्या शोभा काळे यांनी या महिलांना उद्योग व्यवसायाची नवी वाट दाखविली. संस्थेने येथील काही निवडक महिलांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १५ महिलांनी सुरूवातीला वृत्तपत्राच्या रद्दीपासूनच कागदी पिशव्या बनविल्या. त्या जवळच्या फळविक्रेत्यांना विकल्या. पुढील टप्प्यात आता तुलसी संस्था त्यांना कागदी पिशवी बनविण्यासाठी गम, कागद उपलब्ध करून देत आहे.

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आवारातच महिला आपल्या वेळेनुसार कागदी पिशव्या तयार करत आहेत. दिवसाला दोन किलो कागदी पिशव्या तयार करण्यात येत असून या पिशव्या संस्थाच विकत घेत आहे. शहर परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाद्य घरपोच पोहचविण्यासाठी या पिशव्यांचा वापर केला जात आहे. याविषयी  प्रवराच्या प्रकल्प समन्वयक आसावरी देशपांडे यांनी या महिलांनी तयार केलेल्या वस्तू तुलसी संस्था घेत असल्याने त्यांच्या उत्पादनाचे विपणन, बाजारपेठेसाठी प्रयत्न असे काही होत नसल्याचे सांगितले. उलट हा वेळ ते जास्तीत जास्त पिशव्या तयार करण्यासाठी वापरत आहे. यातून आर्थिक कमाई खूप होते असे नसले तरी या महिला आपला व्यवसाय सोडत नवीन काही करू पाहत आहेत हे महत्त्वाचे. हे काम नियमित राहिल्यास काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढेल अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.

Story img Loader