डोंगर-दऱ्यात वसलेल्या आणि रात्रीच्या अंधारात झाकोळल्या जाणाऱ्या वाघेरा भागातील मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा व वसतिगृह परिसर रविवारी रात्री सौर ऊर्जेच्या प्रकाशाने उजळून निघाला. आजवर रात्रीच्या अंधारात अभ्यास करताना तसेच वावरताना उद्भवणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याचा कोण आनंद शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यास निमित्त ठरले, रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित सौर ऊर्जा विद्युत संच लोकार्पण सोहळ्याचे. जागतिक प्रेम दिनाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमातून अमेरिकेतील शालेय विद्यार्थी, रचनाचे माजी विद्यार्थी व त्यांचे सहकारी यांचे आदिवासी चिमुरडय़ांशी अनोखे भावबंध जोडले गेले.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख कौस्तुभ मेहता, पूर्वेश बागूल, सोलरिका कंपनीचे उदय येवला आदींसह महाराष्ट्र समाज सेवा संघाचे सुधाकर साळी, मिलिंद चिंधडे, संदीप शेटय़े, मुख्याध्यापक नितीन पवार आदी उपस्थित होते. संघाच्या संकल्पनेतून कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पास अमेरिकेतील शालेय विद्यार्थी, संघाचे सदस्य आणि त्यांच्या आप्तमित्रांचे आर्थिक पाठबळ लाभले. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे जवळपास ५६० मुले-मुली या वसतिगृहात वास्तव्यास आहेत. बेभरवशाच्या वीजपुरवठय़ामुळे रात्री अभ्यास होईल याची शाश्वती नसते. परिणामी, अंधार पडण्याआधीच भोजनापासून ते झोपण्यापर्यंतची तयारी त्यांना करावी लागत होती. या प्रकल्पांतर्गत वसतिगृहातील मुले व मुलींच्या खोल्या, व्हरांडय़ातील मोकळी जागा, प्रसाधनगृह अशा एकूण ३० ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे कार्यान्वित करण्यात आले. यामुळे अंधारात बुडणारा परिसर प्रकाशमान झाला असून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा निघाल्याची भावना संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
संघाचे प्रमुख मेहता यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. त्यात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अमेय आशुतोष हडप याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले. आक्षमशाळेत वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी गाद्या उपलब्ध करण्याची जबाबदारी संघाच्या सदस्यांनी स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. दुर्गम भागातून येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व दैनंदिन मूलभूत गरजांचा वार्षिक खर्च २१०० ते २२०० रुपये आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक जबाबदारी उचलण्यासाठी योजना मांडण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या घटकांचे आदिवासी विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जोडले गेल्याचे मेहता यांनी सांगितले. ‘सोलरिका’चे येवला यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन किती प्रमाणात रोखले जाईल, याबद्दल माहिती दिली. शाळा व संस्थेशी नाळ जोडून असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे सार्थक झाल्याची भावना साळी यांनी व्यक्त केली. वीज प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सौर ऊर्जेच्या प्रकाशात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी नृत्य व गाणी सादर केली. तसेच माजी विद्यार्थी संघाच्या प्राची दिंडे, अश्विनी डोंगरे व राधिका माने यांनीही गाणी सादर करत उपस्थितांची दाद मिळविली.