नाशिक – शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) बुधवारी नाशिक येथे आयोजित निर्धार शिबिरात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाल्याने इतक्या जणांचा भार पेलवला न गेल्याने मंचावरील लाल गालीचाखालील टेबल तुटल्याचा खाडकन आवाज झाला. परंतु, काही विपरीत प्रकार घडण्याआधीच उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तातडीने व्यासपीठावरून उतरविण्यात आले. नंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शिबिरास बुधवारी सकाळी नाशिकमधील गोविंदनगर येथील मनोहर गार्डनच्या सभागृहात ‘आम्ही इथेच’ या सत्राने सुरुवात झाली. या दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. उपनेते सुधाकर बडगुजर, नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. व्यासपीठाचा आवाका आणि गर्दीमुळे वाढलेला भार यामुळे टेबल तुटल्याचा आवाज झाला. खूप गर्दी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात येताच काही पदाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वागतोत्सुकांना व्यासपीठावरून खाली उतरवले. व्यासपीठावर लाल गालीचा अंथरलेला असल्याने कोणत्या टेबलचे नुकसान झाले, याची स्पष्टता झाली नाही. व्यासपीठावरून सर्व जण खाली उतरल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू झाले.

‘महाराष्ट्र कुठे चाललाय’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. शिबिरात दिवसभरात विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. आम्ही इथेच या चर्चासत्रात ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, राजाभाऊ वाजे यांनी आपले विचार मांडले. काहीही झाले तरी आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी या चर्चासत्रात व्यक्त केला. पहिल्या आणि द्वितीय सत्रात भोजनासाठी काही वेळ राखीव आहे. यावेळी व्यासपीठावरील नुकसानग्रस्त टेबलचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.