लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महिनाभरासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाला घरातील विविध कामे पूर्ण करायची असतात. यात जमिनीची मोजणी, फेरफार असेही काही वेळखाऊ विषय असतात. सीमेवर तैनात असताना शेताच्या बांधाबाबत धास्ती असते. सुट्टी संपण्यापूर्वी शेतजमिनीची मोजणी वा तत्सम कामे पूर्ण होतील की नाही, याबद्दल साशंकता असते. भारतीय सशस्त्र दलातील जवानांची ही धास्ती दूर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.
भारतीय सैन्यदलातील कार्यरत, निवृत्त सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय यांचे भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील सोमवार (संपूर्ण कार्यालयीन कामकाजाची वेळ) राखून ठेवण्यात आला आहे. उपंसचालक भूमी अभिलेखच्या नाशिक प्रदेश कार्यालयाच्या अखत्यारीत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत जिल्हा कार्यालये आहेत. त्यांच्या अधिनस्त ६४ तालुकास्तरीय भूमी अभिलेख कार्यालय कार्यरत आहेत.
या कार्यालयांमार्फत जमीन मोजणी, मिळकतींचे फेरफार, जमीन संदर्भातील आवश्यक नकाशे, नकला, भूमापन आदी कामे करण्यात येतात. ग्रामीण आणि शहरी भागातील सेवा बजावत असलेल्या सैनिकांना सेवाकाळात कमी प्रमाणात रजा मिळते. त्यांना त्यांच्या स्थावर मिळकतींशी निगडित समस्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी प्रत्येक आठवड्यातील सोमवार राखून ठेवण्यात आला असल्याचे या विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांनी म्हटले आहे.
सुट्टीवर आलेल्या जवानाला घरच्या जमिनीची मोजणी करायची असते. यासाठी तो भूमी अभिलेख कार्यालयात चकरा मारतो. सुट्टी संपत आलेली असते. सर्व प्रकारच्या मोजण्या, फेरफार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात, असे भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. हे लक्षात घेऊन कार्यरत आणि माजी सैनिकांच्या जमिनीची मोजणी, मिळकतींचे फेरफार, नकला आदी सर्व कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागातंर्गत सर्व जिल्ह्यातील कार्यरत, निवृत्त सैनिक वा त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधून अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.