नाशिक – अर्भक मृत्यू आणि बाल मृत्यूदर कमी करणे, हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून पाच ते सात टक्के बालकांचा अतिसारामुळे मृत्यू होतो. या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळा आणि पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात सहा जूनपासून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा येणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस आणि झिंकचा वापर व उपलब्धता वाढविणे, अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे, शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीटभट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले आदी जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे, असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. अति जोखमीच्या क्षेत्राचा नियोजनाद्वारे सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला असून, अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंकचे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतीसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर, इत्यादी महत्त्वाचे संदेश यांचा त्यात समवेश आहे. सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन हात धुण्याच्या टप्प्यांविषयी भित्तीपत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> एका सामान्य शिक्षकाच्या विजयाची सर्वत्र चर्चा
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कार्य करण्याबाबत सूचित केले. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली.
अतिसार नियंत्रण पंधरवड्यात पाच वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओआरएसचे पाकीट वापरण्या बाबतचे महत्त्व सांगतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओआरएस कॉर्नर तयार करण्याबाबत सर्व आरोग्य संस्थांना सूचित केले असून त्यानुसार कॉर्नर तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर – राजाभाऊ वाजे यांची मातोश्रीवर चर्चा
अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
अतिसाराची लक्षणे अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पूर्ववत होणे, स्तनपान न करू शकणे, एका दिवसामध्ये तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे, आदी लक्षणे जाणवल्यास त्वरित शेजारील शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधणे गरजेचे आहे.