लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी अडचणी उद्भवू नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अपूर्ण प्रकरणांच्या त्रुटी दूर करण्यासाठी मंडळगड पध्दतीनुसार सर्व तालुक्यांमध्ये २७ शिबिरे राबविली. त्या अंतर्गत प्राप्त १२ हजार ६६२ शैक्षणिकपैकी ११ हजार ४७४ प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित व नव्याने प्राप्त झालेल्या प्रकरणांसाठी पुन्हा विशेष त्रुटी पूर्तता मोहीम राबविली जाणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत.
हेही वाचा… राष्ट्रवादी भवनवर अजित दादा, भुजबळ समर्थकांचा ताबा
अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्रणालीव्दारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. मात्र अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पाच ते सात जुलै या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व अंतर्गत विशेष मोहिमेंतर्गत अर्जदारांनी त्यांना ई-मेलवर कळविण्यात आलेल्या त्रुटींसह आणि मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उपस्थित राहावे.
हेही वाचा… नाशिक : नोकरीच्या आमिषाने युवकाला गंडा
अर्जदारांकडून या कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या विभागाने म्हटले आहे. दरम्यान, कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करु नये, त्रयस्थ व्यक्तिंच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.