नाशिक: राज्यात ठिकठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव जाणवत असतांना नाशिकही त्यास अपवाद राहिलेले नाही. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात २० हून अधिक गोवरचे रुग्ण आढळले. लसीकरण सत्र राबवत गोवरवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत मालेगावात काही सक्रिय रुग्ण असले तरी जिल्ह्यात इतरत्र गोवरचे रुग्ण नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत पहिले सत्र राबविण्यात येणार आहे.
मुंबई पाठोपाठ नाशिक येथेही गोवरचे रुग्ण आढळले होते. मालेगाव येथे पहिल्या टप्प्यात एक अंकी असणारी संख्या नंतरच्या काळात ७१ पर्यंत पोहचली. नाशिक महापालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी नियंत्रण मिळविण्याचे आवाहन आरोग्य विभागापुढे होते. त्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या मालेगाव शहरात गोवर रुग्णांची संख्या जास्त राहिली. तेथील नागरिकांनी लसीकरणाला नकार दिला. लसीकरण वाढविण्यासाठी धर्मगुरुंच्या मदतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले. सातत्याने लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. घरोघरी जावून सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले असून आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप यासह अंगावर पुरळ असणाऱ्या रुग्णांना औषधोपचार दिला गेल्याने परिस्थिती नियंत्रणास येण्यास मदत झाली. गोवरचे सध्या ५० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे.
हेही वाचा >>> धुळे: महाविद्यालयासाठी निघालेल्या तरुणीचा नकाणे तलावात मृतदेह
दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिले सत्र १५ ते २५ डिसेंबर तर दुसरे सत्र १५ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येईल. याअंतर्गत जिल्ह्यात नऊ ते १२ महिन्यात गोवर रुबेलाचा पहिली मात्रा आणि १६ ते २४ महिन्यांमध्ये दुसरी मात्रा दिली जाणार आहे. वंचित तसेच लसीकरण सत्रातून राहिलेल्या बालकांना लस दिली जाणार आहे. याशिवाय अंगणवाडी माध्यमातून लसीकरण सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.