पंचवटीतील निमाणी बस स्थानक- जुना आडगाव नाका या वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यावरील सेवाकुंज चौकात मागील महिन्यात बसखाली सापडून तीन वर्षीय रोनितचा मृत्यू झाला. या अपघातामुळे नागरिक व पालकांचा उफाळलेला रोष लक्षात घेऊन चौकात गतिरोधक तयार करण्यात आले. प्रमाणापेक्षा अधिक उंचवटय़ाचे हे गतिरोधक वाहनांची गती कमी करण्यासाठी आहेत की वाहनधारकांना पाडण्यासाठी हे लक्षात येत नाही. या ठिकाणी पालिकेने नेमका कोणता निकष लावला, हे कोडे मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना पडले आहे. शहरात कुठेही नसेल इतक्या उंचीच्या गतिरोधकामुळे दुचाकी वाहनधारकांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे. त्याचे प्रत्यक्ष अवलोकन केल्यास पालिकेचा मठ्ठपणा ठळकपणे अधोरेखित होतो. या गतिरोधकांची निर्मिती करताना कोणत्याही तांत्रिक गोष्टींचा विचार झाला नसल्याची तक्रार खुद्द शहर वाहतूक पोलिसांनी केली आहे.
पंचवटीतील निमाणी बस स्थानक परिसरातील सेवाकुंज चौकात शाळा सुटल्यानंतर आजीचा हात धरून रस्ता ओलांडणाऱ्या रोनित चौहाण या चिमुरडय़ाचा बसच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करीत संतापाला वाट मोकळी करून दिली होती. परिसरात तीन शाळा असून दररोज हजारो विद्यार्थी परिसरातून मार्गस्थ होतात. चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद आहे. गतिरोधक व वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटतात. अपघातानंतर पालकांनी संघटित होऊन या प्रश्नावर आक्रमकपणे आंदोलन केले. त्या वेळी तातडीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंच्या मार्गावर गतिरोधक करण्याचे आश्वासन देण्यात आले. पोलिसांनी त्या संदर्भात पालिकेला सूचित केले. गतिरोधकाच्या प्रस्तावाला मान्यता देत महापालिकेने काम पूर्ण केले.
गतिरोधकामुळे मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची गती चौकात संथ होईल, अशी अपेक्षा होती. ही बाब काही अंशी साध्य झाली असली तरी गतिरोधकाने नवीन प्रश्न निर्माण केले. अपघात टाळण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या गतिरोधकाची उंचीच अपघातास कारणीभूत ठरेल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. शहरात इतक्या उंचवटय़ाचे हे एकमेव गतिरोधक असावेत. त्यांची निर्मिती करताना तांत्रिक बाबींचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. वास्तविक गतिरोधक तयार करण्यासाठी शासनाचे काही निकष आहेत; परंतु पालिकेच्या अभियंत्यांनी त्याला फाटा देत या गतिरोधकांची निर्मिती केल्याचे दिसते. गतिरोधकाच्या उंचवटय़ामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो. दुचाकी वाहनधारकांना या समस्येला अधिक तोंड द्यावे लागते. वाहनासह आपला तोल सांभाळण्याची कसरत करताना दुचाकीधारकांना पाय टेकवावाच लागतो. यामुळे अपघात वाढण्याची भीती दुचाकी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात वाहतूक शाखेशी संपर्क साधला असता त्यांनी या चौकातील गतिरोधक तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसल्याचे मान्य केले आहे. त्याबाबतची माहिती पालिकेला दिली गेली असून गतिरोधकात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader