‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाचा वेग वाढला
महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासन यांच्यात चाललेल्या शीतयुद्धात ‘वॉक विथ कमिशनर’ला शह देण्यासाठी सुरू झालेल्या ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाचा वेग वाढला आहे. दौऱ्यात स्थानिकांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. महापौर मूलभूत सुविधांबरोबर इतर समस्या तातडीने सोडवाव्यात असे निर्देश देत आहेत.
शनिवारी आयुक्त तुकाराम मुंढे हे गंगापूर रस्त्यावरील समर्थ जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांशी संवाद साधणार असताना या उपक्रमाच्या आदल्या दिवशी महापौरांनी सातपूर प्रभाग क्रमांक २६ आपला उपक्रम राबवला. शिवशक्ती चौक, खुटवडनगर, चुंचाळे शिवार, अष्टविनायक नगर, अंबड लिंक रोड, पाटील पार्क, शिवाजी चौक, क्रांती चौक आदी भागांची पाहणी केली. या वेळी सभागृह नेते दिनकर पाटील उपस्थित होते.
स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. त्यात डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यावर कचरा गोळा करून ठेवणे, नाल्यांची सफाई, सांडपाणी रस्त्यावर वाहणे, धूर फवारणी, सांडपाण्यामुळे पसरणारी दरुगधी, रस्त्यावर मातीचे ढिगारे, पाण्याची गळती, रस्ते खडीकरण, डांबरीकरण, अस्तरीकरण, चुंचाळे शिवारासह अंबड लिंक रोड परिसरात वाढलेले अतिक्रमण, नव्या वसाहतींमध्ये पाणी, पथदीप, रस्ते आदी समस्यांचा समावेश आहे.
पाहणी केल्यानंतर महापौर भानसी यांनी या समस्या तातडीने सोडवाव्यात, रस्ते, इतर महत्त्वाच्या कामांचे तातडीने प्राकलन करण्याचे आदेश दिले. नाल्याचा प्रश्न गंभीर असून त्याची युद्धपातळीवर स्वच्छता करावी, अंगणवाडीतील दरुगधी, दुरवस्थेचा प्रश्न सोडवावा, परिसरातील अतिक्रमण काढून टाकावे, असेही त्यांनी सूचित केले. या संदर्भात सात दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची सूचना महापौरांनी केली आहे.