मनमाड – मनमाड ते मालेगांव राष्ट्रीय महामार्गावर कुंदलगाव शिवारात गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला उलटून आठ प्रवासी जखमी झाले. चालकासह सहा प्रवाशांना येथील उपजिल्हा रुग्णालयात तर, इतर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य परिहवन महामंडळाच्या बसला अपघात होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. पुणे-दोंडाईचा ही बस मनमाडहून मार्गस्थ झाल्यानंतर कुंदलगाव शिवारात अपघात झाला.

हेही वाचा >>> नाशिक : एटीएम तोडून लाखो रुपयांची लूट

पाऊस सुरू असताना चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे बस घसरत रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात कमलेश निकम (चालक), चैतन्य शर्मा (१७,नंदुरबार), शिवाजी पाटील (६०, कन्हेरे अमळनेर), शोभा भोई (अहमदनगर), मिना पुराबिया (६०, अहमदनगर), मिनाबाई पाटील (५०, अमळनेर) हे प्रवासी जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुणे-दोंडाईचा या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. दुपारी पावणेतीनच्या सुमारास मनमाड स्थानकातून बस मार्गस्थ झाल्यावर अवघ्या २० ते २५ मिनिटांत कुंदलगाव शिवारात हा अपघात झाला. बहुसंख्य जखमींना हात, पाय व पाठीला दुखापती झाल्या आहेत. चालक निकम यांनाही पायाला व हाताला दुखापत झाली आहे.