नाशिक – राज्यात १२ क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मिशन लक्षवेध या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्या अंतर्गत क्रीडा विज्ञान केंद्रांची स्थापना करून चांगले खेळाडू घडविले जातील, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठावर लवकरच तज्ज्ञ खेळाडूची पूर्णवेळ कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी येथे सांगितले.
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बनसोडे यांनी लक्षवेध योजनेला मान्यता देत सरकारने १६० कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. राज्यातील क्रीडा विभागाने १२ खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी लक्षवेध योजना मांडली आहे. क्रीडा विज्ञान केंद्रांमार्फत खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा >>>ठाकरे गटाची कृती लोकशाहीच्या विरोधात – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे टिकास्त्र
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करताना तात्पुरते कुलगुरू म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांना नेमले होते. या विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरूपदाची जबाबदारी तज्ज्ञ खेळाडूकडे सोपविली जाणार आहे. त्या संदर्भात राज्यपालांशी चर्चा सुरू आहे. क्रीडा विभाग पुण्यात ऑलिम्पिक भवन उभारत असून त्यासाठी ७८ कोटींची तरतूद झाल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>येवला पतंगोत्सवात आतषबाजीमुळे दिवाळी अवतरली
बक्षीस रकमेत दहापट वाढ
आंतरराष्ट्रीय, अशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्टातील खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या रोख रकमेत १० पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला एक कोटी (आधी १० लाख), रौप्य पदकाला ७५ लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला ५० लाखाचे रोख बक्षीस सरकारमार्फत दिले जाणार आहे. राज्यातील अशा पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपस्थितीत मुंबईत केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.