राज्यातील विरोधी पक्षाकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे काहीतरी मुद्दे काढून बेछुट आरोप केले जातात. राज्यात शिंदे गट – भाजपचे सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत आहे. या एकंदर स्थितीत विरोधकांना बेछूट आरोप करत सुटणे इतकेच काम राहिले आहे, अशी टीका खा. श्रीकांत शिंदे यांनी केली.
हेही वाचा >>>जळगाव: पारोळ्यानजीक मोटार-टँकर धडकेत डॉक्टरसह अभियंत्याचा मृत्यू
मालेगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना खासदार शिंदे यांनी शहरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दीडशे कोटींची गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. तसेच सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीररित्या निधी गोळा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंदर्भात उपस्थित प्रश्नावर शिंदे यांनी महाविकास आघाडीकडून कुठलाही अभ्यास न करता आरोपांची राळ उडविली जात असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकार गंभीर आहे. या विषयावर अधिवेशनात आज बोलणारे अडीच, तीन वर्षात पहिल्यांदा नागपूरला आले असतील, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या कार्यशैलीवर त्यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केले. राऊत हे दररोज लोकांची सकाळ खराब करतात. जनतेला विकास हवा असून आमचे सरकार तो करीत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील सरकार महाराष्ट्र एकिकरण समितीसोबत असून या संदर्भात योग्य ती पावले उचलली जातील, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा >>>जळगाव: खानदेश नव्हे; तर कान्हादेश म्हणा – हिंदू राष्ट्र जागृती सभेत आवाहन
आत्मपरीक्षणाचा सल्ला
चार भिंतींच्या आत घरात बसल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार, असा प्रश्न करीत खासदार शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. जनता आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. लोकांमध्ये मिसळावे लागते. कार्यकर्ते जपावे लागतात. लोक का सोडून चालले, आपलं काय चुकतंय, हे उध्दव ठाकरे यांनी तपासायला हवे, आत्मपरीक्षण करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात डबल इंजिन सरकार आहे. केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी मदत घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.