दिवाळी सुटीत साधारणत: १५ टक्के भाडेवाढ करत उत्पन्न वाढविण्याची संधी साधताना एसटी महामंडळाने आपल्या हजारो वाहकांना गणिताच्या अभ्यासाचे पाठ देण्याचे ठरविले की काय, अशी साशंकता निर्माण झाली आहे. कारण, अनेक बसमधील इलेक्ट्रॉनिक तिकीट वितरण प्रणालीत हे वाढीव भाडे समाविष्ट करण्यात आलेले नाही. परिणामी, अवघ्या काही सेकंदात जे तिकीट प्रवाशांना देता येते, त्यास नव्या भाडेवाढीनुसार आकडेमोड करून देण्यास तीन ते चार मिनिटांचा अवधी लागतो. ज्या वाहकांकडे भ्रमणध्वनी आहे, त्यांना त्यातील गणकयंत्रावर ही आकडेमोड करता येते. पण, ज्यांच्याकडे अशी काही सोय नाही, त्यांची त्याहून बिकट अवस्था आहे. या घोळामुळे भाडेवाढीने एसटी महामंडळाची चांदी होणार असली तरी वाहकांच्या डोकेदुखीत मात्र भर पडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
ज्या वाहकांचे यंत्र नव्या भाडेवाढीनुसार अद्ययावत झालेले नाही, त्यांना भाडेवाढीची माहिती देणारा कागद देऊन मार्गस्थ केले. यामुळे वाहकांना टप्पेनिहाय भाडे वाढीची आकडेमोड करावी लागते. प्रवाशांना प्रथम मूळ तिकीट दिल्यानंतर नंतर वाढीव भाडय़ाचे दुसरे तिकीट द्यावे लागते. इलेक्ट्रॉनिक प्रणालीमुळे तिकीट वितरणाचे काम खरेतर जलद झाले होते. अवघ्या काही सेकंदात त्यातून तिकीटाची प्रत मिळते. अनेक यंत्रात भाडेवाढीचे दर समाविष्ट झाले नसल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. लांब पल्ल्यांच्या वाहनांमध्ये भाडेवाढीचा तक्ता समोर ठेवून वाहक भ्रमणध्वनीवर वाढीव भाडय़ाची आकडेमोड करताना पाहावयास मिळतात. काही बसच्या तिकीट वितरण यंत्रात ही माहिती समाविष्ट असल्याने त्यांचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. पण, त्यांची संख्या अतिशय कमी असल्याचे आकडेमोडीने बेजार झालेले चालक सांगतात. या संदर्भात महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे विचारणा केल्यावर पहिल्या दिवशी या तक्रारी असल्याचे मान्य करण्यात आले. परंतु, आता सर्व यंत्रांचे अद्ययावतीकरण झाल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.