महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचा पुण्यात मेळावा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढ करारात मान्यताप्राप्त संघटनेच्या स्वार्थी भूमिकेमुळे व नाकर्तेपणामुळे कामगारांवर अन्याय झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केला आहे. कामगारांना २५ टक्के पगारवाढीसाठी २९ ऑक्टोबर रोजी पुणे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंचात शंखनाद मेळावा घेण्यात येणार असून पगारवाढीसाठी संप अटळ असल्याचा इशारा दिला आहे.
२०१२-१६ या कामगार करारात मान्यताप्राप्त संघटनेने कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवून कमी पगारवाढीत कामवाढ करून संघटनेच्या फायद्याचे अनेक निर्णय घेतले. हजारो कोटी रुपये तोटय़ात असलेल्या वीज मंडळाच्या कामगारांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. तर मग एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ का नाही, असा प्रश्नही छाजेड यांनी उपस्थित केला आहे. राज्य परिवहन सहकारी बँकेच्या निवडणूक जाहीरनाम्यात मान्यताप्राप्त कामगार संघटनेने सहावा वेतन आयोगापेक्षा जास्त वेतन मिळवून दिल्याचा खोटा दावा केला असून, सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु एसटी महामंडळ पाचवा व सहावा वेतन आयोग अद्यापपर्यंत लागू करू शकलेले नाहीत. २५ टक्केपगारवाढ मिळण्यासाठी कामगार करार रद्द करावा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणी कालावधी एक वर्षांचा करावा, २००० ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे, अशा कर्मचाऱ्यांना ज्या वेळी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्या वेळेपासून नियमित वेतनश्रेणी देऊन वेतननिश्चिती करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणी देताना १३ टक्के कराराचा फायदा द्यावा, चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापन लागू करण्यात यावी, करारामुळे झालेल्या वेतननिश्चितीमधील त्रुटी दूर करण्यात यावी आदी मागण्याही शंखनाद मेळाव्यात मांडण्यात येणार असल्याचे छाजेड यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा