नाशिक – एखाद्याने दाखविलेला प्रामाणिकपणा दुसऱ्याचे प्राण वाचविण्यास कसे कारणीभूत ठरु शकतात, हे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यामुळे दिसून आले. प्रवासात बॅग हरविल्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात घोळू लागलेल्या अपंग युवकाचे प्राण बस कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे वाचले. तर, दुसऱ्या एका घटनेत बसमध्ये हरविलेले शैक्षणिक कागदपत्रे कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे युवतीला परत मिळाले. कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला.
हेही वाचा >>> मणिपूर हिंसाचार निषेधार्थ जळगावात आक्रोश मोर्चा
इगतपुरी आगारात कार्यरत वाहक गोरख शिंदे आणि चालक प्रकाश खाडे हे कसारा-धुळे मार्गावर कामगिरी पार पाडत असतांना कसारा येथे गेले होते. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले होते. पाऊस जास्त असल्याने बसच्या खिडक्या बंद करण्यास वाहक आणि चालक हे गेले असता त्यांना एक बॅग सापडली. बॅग परत करण्याच्या हेतूने उघडून पाहिली असता राजरत्न प्रभाकर कोकाटे यांची ही बॅग असल्याचे समजले. बॅगेत कोकाटे यांच्या भावाचा भ्रमणध्वनी नंबर मिळाला. त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद आला. नंतर, बस धुळ्यात गेल्यावर भ्रमणध्वनीवरुन राजरत्नशी संपर्क झाला.
हेही वाचा >>> मणिपूर हिंसाचार निषेधार्थ धुळ्यात निदर्शने
राजरत्न यांनी त्यांची बॅग नाशिक- इगतपुरी दरम्यान रेल्वे प्रवासात चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. बॅगेच्या आतल्या कप्प्यात १४ हजार रुपये होते. राजरत्न यांचे इयत्ता १० वीपासून पदवीपर्यंतची सर्व मूळ कागदपत्रे होती. बस कर्मचाऱ्यांनी बॅग सापडल्याची माहिती दिल्यावर राजरत्नने बॅग घेण्यासाठी धुळे गाठले. धुळे येथे आल्यावर राजरत्नने बॅग मिळाली नसती तर आपण आत्महत्या केली असती, असे सांगितले. राजरत्न अपंग आहे. सध्या हिंगोली जिल्हा परिषदेत लिपिक पदावर कार्यरत आहे. त्यांची इस्त्रोमध्ये निवड झाली असून त्या संदर्भातच राजरत्न मुंबईला रेल्वेने निघाला होता. चोराने बॅग चोरुन वरच्या कप्प्यात असलेले १७०० रुपये काढून घेत बॅग बसमध्ये टाकून दिली होती. शिंदे आणि खाडे यांच्या प्रामाणिकपणामुळे बॅग राजरत्नला परत मिळाली. दुसऱ्या एका घटनेत इगतपुरी आगाराची महिला वाहक मीना आहेर यांना इगतपुरी – नाशिक बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीची कागपत्रे आणि पाकिट मिळाले. त्यात ८१५ रुपये होते. त्यांनी संबंधित मुलीला तिचे रु.८१५ आणि मूळ कागदपत्रे परत केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्या हस्ते शिंदे, खाडे आणि मीना आहेर यांचा गौरव करण्यात आला.