लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : राज्य सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ यांसारख्या योजना राबवित असताना राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत विभागातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे एसटी बससेवा पूर्णत विस्कळीत झाली. मंगळवारी सकाळपासून आंदोलकांनी आगारातून एकही बस बाहेर पडू दिली नाही. परिणामी, पुणे, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घेणे भाग पडले आहे.

वेतन वाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी १३ आगारातील ४८०० कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. यात चालक, वाहक, यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे १३ आगारातून सकाळपासून बसेस बाहेर पडल्या नाहीत. जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णत विस्कळीत झाली. १३ आगारांत एकूण ९०० बस असून सकाळपासून काही अपवाद वगळता लांब पल्ल्याच्या व जिल्ह्यांतर्गत बससेवेवर विपरित परिणाम झाला.

आणखी वाचा-नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा

पुणे, मुंबई, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी ताटकळत असल्याचे मेळा स्थानक, ठक्कर बजार, महामार्ग बसस्थानकात पहायला मिळाले. आसपासच्या तालुक्यात शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बस नसल्याने माघारी परतावे लागले. टपाल सेवेवरही त्याचा परिणाम झाला. लासलगाव व विंचूर भागात आजचे टपाल उशिराने पोहोचणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. रात्री बाहेर पडलेल्या तुरळक बस रस्त्यावर व स्थानकात दिसत आहे. त्या आगारात पोहोचल्यानंतर ते कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन संपूर्ण सेवा ठप्प पडणार असल्याचे सांगितले जाते.

आणखी वाचा-भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव आणि सदस्य कृती समितीचे सदस्य सुनील गडकरी यांनी १३ आगारातील सर्वच कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा केला. राज्य सरकार लाडकी बहीणसह विविध योजना राबवित आहे. वीज कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ दिली गेली. परंतु, राज्य परिवहन महामंडळाच्या वेतन करार २०१६ पासून प्रलंबित आहे. मध्यंतरी सरकारने २० ऑगस्टपर्यंत वेतनाबाबत अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र अद्याप ती बैठक झाली नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.

१५० फेऱ्या रद्द

काही आगारांत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यात नाशिक एक व दोनसह काही आगारांचा समावेश आहे. उपरोक्त आगारात सकाळपासून १०० ते १५० फेऱ्या रद्द झाल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St traffic disrupted in nashik section due to agitation plight of passengers mrj