स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे आणि नाशिक बार असोसिएशनच्या सहकार्याने २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत येथे अ‍ॅडव्होकेट चॅम्पियन लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्य़ांतील १०३ संघांच्या माध्यमातून दीड हजार वकील सहभागी होणार आहेत.

या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी सात वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर माजी क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फलके, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, चित्रपट दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांच्यासह अ‍ॅड. का. का. घुगे, अ‍ॅड. यतीन वाघ आदी उपस्थित राहणार आहेत.

दिवस-रात्र पद्धतीने हे सामने होणार आहेत. त्यासाठी शहरातील २० मैदानांवर १३५ सामने होतील. या सामन्यांसाठी ५५ पंच आणि २५ स्कोअरर कार्यरत राहणार असल्याचे जगदाळे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक कै. अ‍ॅड. बाबुराव ठाकरे, कै. अ‍ॅड. नारायण बस्ते तसेच विविध मान्यवरांच्या स्मरणार्थ स्मृतिचषक देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील सवरेत्कृष्ट गोलंदाज, सवरेत्कृष्ट फलंदाज, सामनावीर यासाठी वेगवेगळे चषक देऊन खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेत बेळगाव, पणजीसह राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ातील वकिलांचे सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था संयोजकांनी केली आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, महात्मानगर, शिवाजी स्टेडिअम आदी मैदानांवर हे सामने होणार आहेत.

Story img Loader