नाशिक- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी आपण तयारी केली, तेव्हा माघार घ्यावी लागली. आताही माघारीसाठी दबाव आहे. मी कधी, कुठे आणि का म्हणून थांबायचे, असा प्रश्न करुन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अखेरच्या क्षणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली.
या निवडणुकीसाठी बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. तत्पूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक येथे बैठक घेत डॉ. राजेंद्र विखे यांची समजूत काढली. महायुतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. त्यामुळे माघारीची विनंती त्यांनी केली. बैठकीनंतर उभयतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांनी महायुतीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. महायुतीकडून आपणास उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्न केले होते. निवडणूक लढविण्याची तयारी झाली होती. आपण कितीवेळा माघार घ्यायची, असा उद्वेगजनक प्रश्न त्यांनी केला. पक्ष वारंवार डावलत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे नमूद केले. शिक्षक मतदारसंघातून प्रतिनिधीमार्फत अर्ज सादर करून त्यांनी माघार घेतली.
हेही वाचा >>>शिंदे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्याची माघार, नाशिक शिक्षक मतदारसंघ
नाशिक विभाग पदवीधर आणि आता शिक्षक मतदारसंघातून दोनवेळा डावलण्यात आल्याची बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची भावना झाली आहे. या जागेवर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार आहेत. महायुतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल. त्यामुळे भावाने माघार घ्यावी, अशी विनंती केली, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उमेदवार निवडीस पुन्हा विलंब झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघ या पूर्णपणे वेगळ्या निवडणुका असून त्यांचा दुरान्वयेही संबंध नसल्याचा दावा केला. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. महायुतीतील समन्वयाबद्दल कल्पना नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचित केल्यानुसार भावाला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.