नाशिक: पेठहून नाशिककडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला पंचवटीत अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. चालकाने प्रसंगावधान दाखवित बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर प्रवासी उतरल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावर मिरची चौक परिसरात काही महिन्यांपूर्वी यवतमाळ येथील खासगी प्रवासी बस, सप्तश्रृंगी गड परिसरात राज्य परिवहन महामंडळाची बस, सिन्नर तालुक्यातही पळसे परिसरात बसला आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.
या घटना ताज्या असताना बुधवारी पेठहून नाशिककडे येणारी बस पंचवटीतील फुले नगरात आली असता अचानक बसमधून धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. प्रवासी तातडीने खाली उतरले. मुख्यालयातून बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
बसला आग लागल्याचे दिसताच रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. महामंडळाच्या वतीने अपघातग्रस्त बस आगारात नेण्यात आल्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे महामंडळाच्या बसच्या दुरूस्ती आणि देखभालविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.