मजबूत बांधणीतील १० बस दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवीण झगडे, नाशिक

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य परिवहनने अ‍ॅल्युमिनिअमच्या बांधणीतील ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिवर्तन बसची बांधणी आता सौम्य लोखंड (एमएस) धातुत करण्यास सुरूवात केली आहे. जुन्या गाडय़ांना या मजबूत बांधणीत परावर्तीत केले जात आहे. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीतील बस अपघातात प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण अधिक असते. हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलले गेले आहे. अपघातात कोणी जखमी होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात असली तरी मुळात अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याची तितकीच आवश्यकता असल्याची प्रवासी वर्गाची भावना आहे. आरामदायी आसन व्यवस्था आणि मजबुतीचा नवीन साज चढविलेल्या १० बस नाशिक विभागात दाखल झाल्या आहेत. पुढील वर्षांत या स्वरूपातील १०५ लालपरी बांधणीचे नियोजन आहे.

राज्य परिवहनच्या ताफ्यात लाल परींची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात सर्वदूर सेवा देणारी बस सेवा विद्यार्थी, चाकरमान्यांसह सर्वाचा आधार आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी एसटी बसला प्राधान्य देतात. बसची काळजी घेणाऱ्या, अपघात न करणाऱ्या चालकांना सन्मानित करून महामंडळाकडून प्रोत्साहन दिले जाते. असे असले तरी अधूनमधून एसटी बसचे अपघात घडत असतात. लालपरी अर्थात परिवर्तन बसच्या अपघातात अनेकदा प्रवासी जखमी होतात. परिवर्तन बसची बांधणी अ‍ॅल्युमिनिअम धातूच्या वापराने झालेली आहे. लोखंड किंवा अन्य धातूंच्या तुलनेत अ‍ॅल्युनिअम कमकुवत धातू असल्याने हे घडत असल्याचे निदर्शनास आले. मग प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन महामंडळाने लाल परीच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अ‍ॅल्युमिनिअमऐवजी सौम्य लोखंड धातूचा वापर करण्याचे निश्चित झाले. सध्या सर्वत्र धावणाऱ्या लाल परींची बांधणी या नव्या प्रकारात करण्याचे काम औरंगाबाद, नागपूर आणि पुण्याच्या दापोडी येथील कार्यशाळेत प्रगतीपथावर आहे. प्रत्येक कार्यशाळेत सध्या महिन्याकाठी १०० ते १५० बसची बांधणी केली जात आहे. बांधणीत सौम्य लोखंडचा वापर केला जात आहे.

नाशिक विभागातील १० बसच्या बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. नवा साज घेऊन दाखल झालेल्या या गाडय़ा सिन्नर, नांदगाव, कळवण आगारात पाठविण्यात आल्या आहेत. पुढील वर्षांत नाशिक विभागातील १०५ गाडय़ा असे नवे रूप धारण करतील. या बदलामुळे गाडय़ांचे वजन वाढले असून डिझेलचा खर्चही वाढणार आहे. महामंडळ बसची बांधणी दणकट करून प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचा विचार करत आहे. परंतु, काही चालक बस चालविताना नियमांचे पालन करत नाही. चालकांच्या चुकाही अनेकदा अपघाताचे कारण ठरतात. सुरक्षित वाहतुकीसाठी अर्थात अपघात होणार नाहीत, याकडे तितकेच गांभिर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नाशिक ते संगमनेर असा दररोज बसने प्रवास करणाऱ्या दीप्ती काजळे या विद्यार्थिनीने लाल परी बसमधील आसन व्यवस्था ही शिवशाहीच्या धर्तीवर असल्याने उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशी जागा नसते, यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते, याकडे लक्ष वेधले.

जुन्या परिवर्तन बस अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या असल्याने अपघातात जखमी होण्याचे प्रमाण अधिक होते. हे लक्षात घेऊन नव्याने सौम्य लोखंडाचा उपयोग जुन्या बसच्या बांधणीसाठी नवीन निकषानुसार करण्यात येत आहे.

      -एम. एस. पुवर  (यंत्र अभियंता, एसटी कार्यशाळा, नाशिक)