धडगाव पीडित प्रकरणात दोषी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन चालणार नाही तर संबंधितांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. या घटनेची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून दोषींना सोडले जाणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.वाघ यांनी धडगाव तालुक्यातील खडक्या येथे पीडिताच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांच्या भावना जाणून घेत कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा सांगताना आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे पुर्णत दुर्लक्ष झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे वाघ यांनी सांगितले. या प्रकरणात धडगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्यासह सहा पोलिसांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पण केवळ बदली करुन चालणार नाही, त्यांच्या निलंबनाची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नवरात्रोत्सव : देवीच्या मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता
जे.जे रुग्णालयात पुर्नशवविच्छेदनसाठी आणलेला मृतदेह काही प्रमाणात कुजला असली तरी रासायनिक परीक्षणासाठी काही गोष्टी पाठवण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यात धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास. त्यांच्यावर कारवाई आणि या चौकशीसाठी वैद्यकीय पथक नेमण्याची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यात कुणीही दोषी असो, त्याला सोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्यावतीने सर्वोत्तम सरकारी अभियोक्ता नेमुन पीडितेच्या कुटुंबास न्याय दिला जाईल, असेही वाघ यांनी सांगितले. पिडितेच्या वडिलांनी सध्या सुरु असलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर वाघ यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात जाऊन या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली.