जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव पॅरिसला पाठविला आहे. हिंदू संस्कृतीचे जतन करणाऱ्या या उत्सवाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्यास कुंभमेळ्यास वेगळे परिमाण प्राप्त होईल.
कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश व्हावा यासाठी शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे हे पाठपुरावा करत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्यास तत्त्वत: मान्यता देऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. साधू-महंतांच्या साक्षीने व लाखो भाविकांच्या सहभागाने अलाहाबाद, उज्जन, हरिद्वार व नाशिक या ठिकाणी देशात कुंभमेळा होतो. जगभरातील पर्यटक व भाविक पवित्र स्नानाचा योग साधतात. हिंदू संस्कृतीचे जतन करणाऱ्या सिंहस्थाद्वारे भारतीय संस्कृती, संस्कार, भावना व श्रद्धा जगभरात पोहोचावी यासाठी युनेस्कोच्या यादीत त्याचा समावेश होण्याची गरज मांडण्यात आली. प्रस्ताव तयार करताना सिंहस्थ कुंभमेळ्यातील छायाचित्रण, चित्रीकरणाचाही अंतर्भाव करण्यात आला. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांनी कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव पॅरिसला पाठविण्यात आल्याची माहिती दिल्याचे गोडसे यांनी नमूद केले. युनेस्कोद्वारे पारंपरिक व धार्मिक उत्सवाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जातो. त्यांची जागतिक वारसा म्हणून ओळख निर्माण होते. युनेस्कोच्या यादीत ज्या उत्सवांचा समावेश होतो, त्या उत्सवाला आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत मिळू शकते. अशा उत्सवाची देखभाल संस्था करते. युनेस्कोच्या जागतिक वारशात यापूर्वी समाविष्ट झालेल्या कुट्टियत्तम, संस्कृत थिएटर, वैदिक मंत्रोच्चार परंपरा, रामलीला, रम्मन धार्मिक सण, हिमालयातील विधी थिएटर, छाऊ नृत्य आदींना महत्त्व प्राप्त झाल्याचे लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा