लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शेतकर्‍यांकडून आता शेतीकामांनाही वेग देण्यात आला आहे. बोगस रासायनिक खतांसह बियाण्यांच्या विक्रीवर कृषी विभागाचे अधिकारी नजर ठेवून आहेत. कृषी विभागाच्या पथकाने पाचोरा शहरालगतच्या जारगाव शिवारातील गोदामात छापा टाकत सुमारे दोन लाख ३८ हजार ६२९ रुपयांचा ६.७८ टन बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त केला. पाचोरा येथील पोलीस ठाण्यात गोदाममालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचोरा शहरालगत जारगाव शिवारात मधुकर भोकरे-वाणी (रा. शिवाजीनगर, पाचोरा) यांच्या मालकीचे गोदाम आहे. ते त्यांनी दीपचंद्र श्रीवास यांना भाड्याने दिले आहे. त्यांच्याकडून गोदामात गुजरातमधील विल्सन फार्मर कंपनीने उत्पादित बोगस रासायनिक खतांचा साठा करून गावोगावी जाऊन विक्री केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती जळगाव येथील कृषी विभागाचे नियंत्रक अरुण तायडे यांना मिळाली. त्याअनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, कृषी पर्यवेक्षक अविनाश चंदिले यांच्यासह पाच जणांच्या पथकाने जारगाव येथील मधुकर भोकरे-वाणी यांच्या मालकीच्या गोदामात छापा टाकला. गोदामात सुमारे दोन लाख ३८ हजार ६२९ रुपयांचा ६.७८ टन बोगस रासायनिक खते आढळून आली. पथकाने परवाना व अनधिकृत खतसाठ्याबाबत दीपचंद्र श्रीवास यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा… मालेगाव : मंदिरातील दानपेटी, चरण पादुका चोरणाऱ्या तिघांना अटक

पथकाने खतांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कृषी अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा येथील पोलीस ठाण्यात दीपचंद्र एम. श्रीवास (रा. नामपूर, सटाणा, नाशिक), विल्सन फार्मर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडचे राधास्वामी सुमीर (आनंद लांभवेल रोड, झायडस हॉस्पिटलजवळ, आनंद, गुजरात, कंपनीमालक), गोदाममालक मधुकर भोकरे (रा. जारगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

“खरीप हंगाम २०२३ मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व विनाबिलाने बियाणे, खतांची खरेदी करू नये, तसेच अशा कृषिनिविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी (०८९८३८३९४६८ व ०२५७-२२३९०५४) संपर्क साधून माहिती द्यावी.” – मोहन वाघ (विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock of bogus chemical fertilizers seized in a warehouse in jargaon dvr