जळगाव – शहरातून नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंग गडावर जाणाऱ्या दिंडीवर मंगळवारी रात्री धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात तीन भाविक जखमी झाले. या धुमश्चक्रीत १२ ते १५ मोटारींसह दुचाकी व काही दुकानांची तोडफोड झाली. दगडफेक करणार्यांवर कारवाईसाठी जमाव पोलीस दूरक्षेत्र ठाण्यावर धडकला. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
घटनेची माहिती गावात मिळाल्यानंतर काहीजणांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्र गाठत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात समोरासमोर आलेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनासह पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांच्या मोटारीचीही तोडफोड करण्यात आली.
हेही वाचा – अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना कारावास; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम
जळगाव, धरणगाव आणि चोपडा येथून पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला. जळगावमध्ये या घटनेची माहिती होताच काहीजणांनी पाळधीकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी वाहनांची तपासणी करीत अनेकांना माघारी परत पाठविले. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच पोलिसांनी ज्या भागात दगडफेक झाली तेथील संशयितांची धरपकड सुरू केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.