नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावावा, नमामि गोदा आराखड्याला मंजुरी देऊन भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, गोदावरी पात्रात जाणारे गटारीचे पाणी थांबवावे, कुशावर्तात पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे, त्र्यंबकेश्वरमधून वाहणाऱ्या गोदावरीची स्वच्छता करावी, शहरात टायरबेसऐवजी इतर शहरांप्रमाणे मेट्रो सुरू करण्यात यावी, आदी मागण्या आमदार छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनात केल्या.

अर्थसंकल्प अनुदानावरील चर्चेदरम्यान भुजबळ यांनी नगरविकास आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत प्रश्न मांडले. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेसह विविध विभागांचा जवळपास १५ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा शासनाला पाठविला आहे. त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी आतापासून भूसंपादन करणे आवश्यक आहे. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केल्यास कामे निकृष्ट होतात, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

गोदापात्रात शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणीही मिसळत आहे. पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमधूनही गोदावरी मध्ये सांडपाणी जाते. शहरातील प्रमुख ५० पैकी सुमारे २५ ठिकाणी गटारीचे सांडपाणी गोदावरीमध्ये सोडले जात आहे. सिंहस्थात केवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची संख्या वाढविण्याऐवजी गोदापात्रात सांडपाणी सोडणारी केंद्रे त्वरित बंद करणे आवश्यक आहे. नमामि गोदासाठी केंद्र शासन निधी देणार की राज्य शासन, याविषयी स्पष्टता नसल्याने निधी कधी मिळणार, असा प्रश्न आहे.

या प्रकल्पासाठी नाशिक महानगरपालिकेकडून १८०० कोटी रुपयांचा पहिला, त्यानंतर २७८० कोटी रुपयांचा दुसरा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून कुंभमेळ्याचा विकास आराखडा मंजुर झाला नसला तरी महानगरपालिकेने एक हजार ३७४ कोटीचा मलनिःसारण आराखडा अंमलात आणण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवली. आठवडाभरापासून ही निविदा प्रक्रिया गाजत आहे. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात पाणी स्वच्छ करणारे यंत्र बसवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नाशिकची लोकसंख्या वाढत असल्याने टायरबेस मेट्रो नको तर नियमित मेट्रो सुरू करावी, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.