नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी पावसाने नुकसान झाले. देवळा तालुक्यात वीज पडून २० वर्षाच्या युवकाचा तर, उमराणे येथे शेड कोसळून एकाचा मृत्यू झाला. महिला आणि बालक जखमी झाले.
दोन दिवसांपूर्वी सुरगाणा, कळवण, सिन्नर, निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांची पडझड झाली होती. तेव्हा पिंपळगाव बसवंत परिसरात गारपीटही झाली होती. रविवारी देवळा तालुक्यात तशीच स्थिती निर्माण झाली. तिसगाव येथे वीज पडून आकाश देवरे (२०) हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. शरद देवरे यांच्या शेतात वीज पडल्याने वासराचा मृत्यू झाला. वासराजवळ उभा असलेला त्यांचा मुलगा आकाशही या दुर्घटनेत मयत झाला. उमराणे येथे कांदा शेड कोसळून देविदास आहेर (४०) यांचा मृत्यू झाला. या कुटुंबातील गायत्री देवरे (२५) आणि अभय देवरे (साडेतीन वर्ष) हे जखमी झाले. उमराणे येथे काही शेड व घरांचे नुकसान झाले. वीज पडून पशुधनाचे नुकसान झाले.
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथे वीज पडून नरेंद्र शिंदे यांची गाय मयत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून वा शेड कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. याआधी तोरंगण येथे वीज पडून यादव बोरसे (४८) यांचा मृत्यू झाला होता.