नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकसाठी अडीच वर्षांत योगदान काय, असा प्रश्न करणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीने तिखट शब्दांत हल्ला चढविला आहे. महानगरपालिकेत भाजपच्या कार्यकाळात अनेक योजना थांबविल्या गेल्या. कुठलेही प्रकल्प राबविले गेले नाही. त्यामुळे नाशिकच्या हितासाठी भाजपने काय दिवे लावले याचा हिशेब द्यावा आणि उपऱ्यांना आम्हाला शिकवण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचा टोला राष्ट्रवादीने महाजन यांना उद्देशून लगावला आहे.
पालकमंत्री भुजबळ यांच्या निर्देशानुसार भाजपच्या कार्यकाळात मंजूर झालेले उड्डाणपूल, आयटी पार्क, दादासाहेब फाळके स्मारकाचे नूतनीकरण आदी खर्चीक विषयांवर फुली मारली जाणार आहे. तब्बल ८०० कोटींच्या भूसंपादनाच्या मार्गी लावलेल्या प्रस्तावांमध्ये कुणाचे स्वारस्य होते याची छाननी करण्यात येणार आहे.
या घटनाक्रमावर भाष्य
करताना महाजन यांनी पालकमंत्री भुजबळ यांनी अडीच वर्षांत नाशिकला किती निधी दिला, कोणत्या योजना मार्गी लावल्या याची स्पष्टता करण्याचे आव्हान दिले होते. त्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत महाजन यांच्यावर आगपाखड केली. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी टीका करण्याचा आणि विशेषत: उपरे असताना आम्हाला शिकविण्याचा माजी मंत्री गिरीश महाजन यांना कुठलाच अधिकारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीची दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली गेली. या काळात आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्राधान्य देऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केले. या कालावधीत कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन तसेच मोफत स्वरूपात नागरिकांना धान्य उपलब्ध करून देत दिलासा दिला. करोनात सर्वाधिक निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यास शासनाचे प्राधान्य होते. तरीदेखील जिल्ह्यातील विकासकामे थांबली नाही.
गंगापूर मेगा पर्यटन संकुल-बोट क्लब, साहसी क्रीडा संकुल, ग्रेप पार्क रिसॉर्टची कामे पूर्ण होऊन हे प्रकल्प खुले झाले. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था मंजूर करून घेतली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधीची तरतूद होऊन काम सुरू झाले. जिल्हा न्यायालय नूतन इमारत, जिल्हा परिषद नूतन इमारत, वन्यजीव संरक्षण केंद्र- रुग्णालय म्हसरूळ, संदर्भ सेवा रुग्णालय विस्तारित इमारत, महिला व नवजात शिशू रुग्णालय ही कामे हाती घेतली. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये प्राणवायूनिर्मिती प्रकल्प बसविले गेले. अमृत संस्थेचे मुख्यालय नाशिकमध्ये आणले. अशी कामांची मोठी यादी असून त्याचा हिशेब देण्याची गरज नाही. मात्र भाजपने पाच वर्षांत कुठले दिवे लावले आणि विझविले, त्याचा हिशेब महाजन यांनी नाशिककरांना द्यावा, अशी टीका ठाकरे यांनी केली.