नाशिक: पॉश आणि पोक्सो कायद्यान्वये दाखल होणाऱ्या खऱ्या गुन्ह्यात गुन्हेगाराला निश्चितपणे कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु, घरगुती हिंसाचार प्रतिबंधकसारख्या कायद्याचा दुरुपयोग होताना दिसतो. कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग होणे अतिशय हानीकारक असते. ज्यांच्या संरक्षणासाठी तो तयार केला आहे, त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी समाजाने सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले.
शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात लेखिका ऋता पंडित यांच्या स्त्री : व्यक्त-अव्यक्त या पुस्तकाचे प्रकाशन माजी न्यायमूर्ती भाटकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. कायद्याचा वापर, गैरवापर हे सामान्य नागरिकांच्या हाती आहे. कायद्याचा गैरवापर थांबविणे हे ते तयार करणारे तसेच न्यायालयांची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दिवसेंदिवस खालावत चाललेल्या सामाजिक नितीमत्तेचा विचार करण्याची वेळ आली आहे. आजची युवा पिढी समाज माध्यमांवर व्यक्त होते. या माध्यमात त्यांना शेकडो मित्र असतात, पण आसपास राहणारे ज्ञात नसतात. याचे तरूण पिढीवर भयावह परिणाम होत असून आपण वेळेत जागे व्हायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुलींचे शिक्षण आणि नोकरीचा घटस्फोटांचे प्रमाण वाढण्याशी संबंध नाही.
हेही वाचा… मुक्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन
संबंधितांना समूपदेशनाची गरज आहे. पालकांनी त्यांना स्वातंत्र्य देऊन मुक्तपणे जगू द्यायला हवे. स्त्री कुटुंब, समाजाचा केंद्रबिंदू आहे. ती कुटुंब बांधून ठेवते. समाज घडवू शकते. कुटुंब संस्था देशाचे बलस्थान आहे. समाज. सुसंस्कृत करण्यासाठी या पुस्तकातून त्या दिशेने पाऊल उचलले गेल्याची भावना भाटकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा… नाशिकमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष स्थापन – जिल्हा, तालुकास्तरावर समिती गठीत
मेन अगेस्ट व्हायलेन्स ॲण्ड अब्युझचे संस्थापक हरीश सदानी यांनी समता, समाज घडविण्याच्या लढाईत आपला शत्रू पुरुष नसून पारंपरिक पुरुषी, वर्चस्ववादी प्रवृत्ती असल्याचे नमूद केले. त्यामुळे पुरुषांच्या मानसिकेतवर काम करायला हवे. लिंगभेदाचे प्रश्न केवळ महिलांचे नसतात. ते समलिंगी आणि तितकेच पुरुषांचेही असतात. याचे भान समाजात अद्याप तितकेसे आलेले नसल्याचे त्यांनी सूचित केले. लेखिका ऋता पंडित यांनी लिखाणातून स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळाला, तसेच सभोवतालच्या घडामोडींकडे सजगतेने पाहण्याची दृष्टी मिळाल्याची भावना व्यक्त केली. लिखाणाने समाजाभिमुख बनवले, स्वत:ची नव्याने ओळख करून दिली, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.